Ambadas Danve Indirect Dig At Chandrakant Khaire: सातारा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच येथील उमेदवार कोण असतील यासंदर्भातील उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे. शुक्रवारी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच दिली. साताऱ्यात शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधताना या मतदारसंघातून कोणला उमेदवारी द्यायची याबद्दल येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असं जाहीर केलं आहे. शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत उमेदवारी नम्रपणे नाकारली असतानाच आता या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये टोलवाटोलवी सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून बरेच प्रयत्न करुनही उद्धव ठाकरे गटाने तिकीट नाकारलेले विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानेवेंनी श्रीनिवास पाटलांचा संदर्भ देत अप्रत्यक्षपणे उमेदवारी मिळालेले स्वपक्षीय ज्येष्ठ नेते चंद्रकात खैरेंना टोला लगावला आहे.


खैरेंना टोला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबादास दानवेंना श्रीनिवास पाटील यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकल्यानंतर अंबादास दानवेंनी, "श्रीनिवास पाटलांकडून अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे," असं मत व्यक्त केलं. श्रीनिवास पाटलांच्या निर्णयाचा संदर्भ देत अंबादास दानवेंनी पुढे, "अशाप्रकारे दुसऱ्यांना संधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्यानंतर शरद पवार योग्य तो उमेदवार देतील. सगळ्यांनीच अगदी वर पासून खालीपर्यंत सर्वांनीच तरुणांना संधी दिली पाहिजे. नवीन लोकांना संधी दिली पाहिजे," असं उत्तर दिलं.


नक्की वाचा >> Video: उदयनराजेंना तुम्ही तिकीट देणार का? प्रश्न ऐकताच कॉलर उडवत शरद पवार काय म्हणाले पाहा


हा टोला आहे का? विचारल्यावर म्हणाले...


अंबादास दानवेंना, "हा टोला आहे का?" असं विचारल्यावर त्यांनी हसतच, "हा टोला नाही" असं सांगितलं. अंबादास दानवेंनी थेट कोणाचाही उल्लेख केला नसला तरी त्यांच्या टीकेचा रोख चंद्रकांत खैरेंच्या दिशेने होता. चंद्रकांत खैरेंऐवजी आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी अंबादास दानवे मागील बऱ्याच काळापासून प्रयत्न करत होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची यासाठी बंद दाराआड बैठकही पार पडली होती. मात्र उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्याचं स्पष्ट झालं.


नक्की वाचा >> 'खैरेंचं काम करणार नाही, मी...'; उमेदवार यादीतून वगळल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया


 


खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दानवे काय म्हणालेले?


चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आंबादास दानवेंनी, "वर्षभरापासून शिवसेना यासाठी तयारी करत आहे. सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, जनतेची मतं जाणून घेऊन उमेदवारी जाहीर केली आहे. दिल्ली गाठण्यासाठी नश्चितच ही प्रभावी यादी आहे," अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. तसेच, "या यादीतील जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहोचतील. जे आता 400 पार म्हणत आहेत त्यांना तडीपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत हा शिवसेनेचा संकल्प आहे," असं दानवे म्हणाले.