Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय, पुढच्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसांच्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत. लातूरमधल्या औसा तालुक्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा
अमित शाह हे शेपूट घाले गृहमंत्री असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मणिपूर पेटलं तेव्हा तिकडे अमित शाहांनी शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात फणा उगारतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी लातूरमधल्या सभेत केलीय. 
मोदी हे नाव नव्हतं तेव्हाही धाराशिव शिवसेनेचंच होतं. हिंमत असेल तर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला जावं, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. 


उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा उल्लेख नागोबा असाही केला. काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही, अरुणाचलमध्ये चीन घुसलंय तिथे जात नाही. या राज्यात त्यांनी शेपूट घातलंय. असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येतो आणि आमच्यावर फणा काढून जातो. पण त्यांची या राज्यांमध्ये जायची हिंमत होत नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.


'देवेंद्र फडणवीस चोरांचा सरदार'
यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार, त्यांना आता जेलमध्ये टाकायचंय, असं राऊत लातूरमधल्या औसाच्या सभेत म्हणाले. 


शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी
शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी भाजपला इशारा दिलाय. केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असा इशारा कदमांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत जागावाटपावरून रणकंदन सुरू असताना रामदास कदमांच्या थेट इशा-यामुळे शिवसेना-भाजपत वादाची ठिणगी पडलीय.. तर रामदास कदमांनी टोकाचं बोलू नये, आमचं शिंदेंना पूर्ण समर्थन असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तर संजय राऊतांनी रामदास कदमांना टोला लगावलाय.. 


बच्चू कडूंचा धक्कादायक दावा
दरम्यान, लोकसभेसाठी उमेदवार शिंदे-अजित पवार गटाचे आणि चिन्हं कमळ असं चित्र पाहायला मिळेल असा खळबळजनक दावा आमदार बच्चू कडू यांनी केलाय. सत्ताधारी पक्षातील आमदारानंच असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. तर आम्ही घड्याळ निशाण्यावरच लढू असं उत्तर मंत्री छगन भुजबळांनी दिलंय.