सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याच्या निर्णयास विरोध, `वंचित`ची शिरुरच्या उमेदवारावर कारवाई
Loksabha Election 2024: कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीने महत्वाचा निर्णय घेतलाय.
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राजकी पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केलीय. नावे जाहीर झालेल्या उमेदवारांवर मतदार, कार्यकर्त्यांसोबत स्वपक्षातील वरिष्ठांचीही बारीक नजर असल्याचे दिसून आले आहे. आपल्या उमेदवारामुळे समाजात, कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीने महत्वाचा निर्णय घेतलाय.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.
बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी भेट दिली. या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे शिरुर मतदार संघातील उमेदवार मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते.lतसे फोटोदेखील सोशल मीडियात व्हायरल होत होते. भाजप हा एक नंबरचा विरोधक असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीकडून वारंवार मांडण्यात येते. अशावेळी मंगलदास आणि फडणवीसांचे एकत्र फोटो पाहून वंचितवर मोठी टीका होत होती. या पार्श्वभूमीवर वंचितने मोठा निर्णय घेतला आणि मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली. यासोबतच मंगलदास यांनी सुप्रिळा सुळेंसदर्भातील निर्णयावरदेखील नाराजी व्यक्त केली होती.