शिंदेंसाठी CM पदाची खुर्ची सोडणारे फडणवीस `हा` मतदारसंघ सोडायला तयार नाहीत; कारणही तसं खास
Loksabha Election 2024 Why BJP Eknath Shinde Fighting Over Thane Constituency: मुंबईच्या उंबरठ्यावर असलेला मतदारसंघ म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. सध्या या मतदारसंघांमधून शिंदे गट आणि भाजपामध्ये चढाओढ सुरु असल्याचं समजतं. जाणून घेऊयात या मतदारसंघाचं महत्त्वं आणि राजकीय गणितं...
Loksabha Election 2024 Why BJP Eknath Shinde Fighting Over Thane Constituency: महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये अवघ्या 4 ते 5 जागांसंदर्भात तिढा असल्याची माहिती शनिवारी राज्याचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. महायुतीमध्ये वाद सुरु असलेल्या या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघावरुन भाजपा आणि शिंदे गटामध्ये बरीच खलबतं सुरु आहेत. दोघांनाही मुंबईच्या उंबरठ्यावर असलेला हा मतदारसंघ आपल्याकडेच हवा आहे. साधारण मागील अडीच दशकांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघांवर आणि त्यातही तो मुख्यमंत्री शिंदेंचं होमग्राऊण्ड असताना भाजपाकडून का दावा केला जात आहे? या मतदारसंघासाठी भाजपा का हट्ट करत आहे? जाणून घेऊयात सविस्तर...
शिवसेना आणि ठाणे स्पेशल कनेक्शन
शिवसेनेच्या हातात पहिल्यांदा सत्ता देणारं शहर म्हणजे ठाणे! 'शिवसेनेचं ठाणे, ठाण्याची शिवसेना' हे गणित अगदी शिवसेनेत उभी फूटपडेपर्यंत कायम होतं. अर्थात एकनाथ शिंदेंसहीत 40 आमदारांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे राज्याप्रमाणे शिवसेनेचा पारंपारिक मतदार असलेल्या ठाण्यातही 2 गट पडले आहेत. विशेष म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठीही ठाकरे गटाकडून राजन विचारेंना सलग तिसऱ्यांदा खासदारकीचं तिकीट देण्यात आलं आहे. हेच प्रमुख आणि प्राथमिक कारण सांगत भाजपाकडून आता थेट शिंदेंच्या घराच्या मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. शिंदे गटाकडे उमेदवारच नसल्याने ठाणे मतदारसंघ आपणच लढला पाहिजे असं ठाण्याची स्थानिक भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे. त्यांनी अगदी पोटतिडकीने आपली ही भूमिका राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे मांडली आहे. विशेष म्हणजे ही भूमिका वरिष्ठांना पटली असून शिंदेंसाठी अगदी मुख्यमंत्रीपद सोडणाऱ्या भाजपाने ठाणे मतदारसंघ सोडण्यास मात्र अद्याप होकार दिलेला नाही. ठाण्याचं आणखीन एक भावनिक कनेक्शन म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ठाण्यावर विशेष प्रेम होतं. तसेच आनंद दिघे यांनी ठाणेकरांसाठी समाजकारण आणि राजकारणाचा उत्तम मेळ साधत केलेलं कार्य आजही ठाणेकरांच्या मनात घर करुन आहे. त्यामुळेच आकडेवारीच्या गणिताबरोबरच या मतदारसंघाशी शिवसेनेचं भावनिक नातंही तितकेच महत्वाचे आहे.
मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?
ठाणे मतदारसंघाचा अगदी स्वातंत्र्यानंतरपासूनच इतिहास तपासून पाहिल्यास सुरुवातीला या मतदारसंघावर इतर सर्व देशाप्रमाणेच काँग्रेस आणि समाजवादी पक्षांचा प्रभाव होता. त्यानंतर भाजपाने या मतदारसंघावर पकड मजबूत केली. मात्र 1996 साली शिवसेनेचा भगवा येथील लोकसभा मतदारसंघात फडकला आणि तो आजगायत सुमारे 28 वर्ष कायम आहे. मागील 10 वर्षांपासून ठाणेकरांचे प्रश्न लोकसभेत मांडण्याचं काम खासदार राजन विचारे करत आहेत. 2014 मध्ये ते 2 लाख 81 हजारांहून अधिक मतांनी निवडून आले होते. तर 2019 मध्ये मताधिक्याचा आकडा हा तब्बल 4 लाख 12 हजारांहून अधिक होता. मात्र राजन विचारेंचा दोन्ही वेळेस झालेला विजय हा मोदी लाटेत झाल्याचं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात बोललं जातं. यंदा शिंदे गट आणि भाजपा राजन विचारेंच्याविरोधात उमेदवार देणार असल्याने त्यांच्या समार्थ्याचा खरा कस लागणार आहे.
नक्की वाचा >> शिवतारेंची निवडणुकीतून माघार! अजित पवारांना मोठा दिलासा, 1782 कोटींचा उल्लेख करत म्हणाले..
भाजपा आडून बसण्याचं कारण काय?
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांमधील लोकप्रतिनिधी पाहिल्यास भाजपा ठाण्यामधून लोकसभा लढवण्यास का इच्छूक आहे हे सहज समजते. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे शहर, ओवळा-माजिवाडा, कोपरी-पाचपाखाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे नेतृत्व खुद्द एकनाथ शिंदेच करतात. घोडबंदरचा पट्टा असलेल्या ओवळा-माजिवाडा मतदारसंघातूनही शिंदे गटाचे प्रताप सरनाईकच आमदार आहेत. उर्वरित चारही मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत. यात ठाणे शहरमधून संजय केळकर, ऐरोलीमधून गणेश नाईक, मीरा-भाईंदरच्या गीता जैन आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांचा समावेश आहे. त्यामुळेच या मतदारसंघांमध्ये आपला दबदबा अधिक असल्याचा भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा दावा आहे. केवळ मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ इथला आहे या एकमेव कारणासाठी प्रबळ उमेदवार नसताना हा मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडणं स्थानिक नेत्यांना मान्य नाही.
नक्की पाहा हा व्हिडीओ >> Video: उदयनराजेंना तुम्ही तिकीट देणार का? प्रश्न ऐकताच कॉलर उडवत शरद पवार काय म्हणाले पाहा
शिंदेंना का हवाय हा मतदारसंघ?
ठाण्यातील राजकीय जाणकारांच्या मते, लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही महिन्यांमध्येच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिंदेंना ठाणे लोकसभा मतदारसंघ फार महत्त्वाचा आहे. राज्यातील शिंदेशाही सरकारआधीच अनेक वर्षांपासून ठाण्यामध्ये शिंदेशाही आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळेच लोकसभेच्या माध्यमातून येथील 6 विधानसभा मतदारसंघामधील जनाधाराची चाचपणी करण्यासाठी ही निवडणूक कामी येऊ शकते. तसेच शिवसेनेतील वादानंतर राज्यातच नाही देशभरात चर्चेत असलेल्या ठाणे जिल्ह्यावरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी शिंदेंना ठाणे लोकसभा मतदारसंघ हवाच आहे. कल्याण मतदारसंघामधून शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं तिकीट जवळपास निश्चित आहे. ठाणे जिल्ह्यावरील पारंपारिक मतदारांवरील प्रभाव टिकून ठेवण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.