Loksabha Election 2024 Big Relief To Ajit Pawar: बारामती लोकसभा मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पती सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा असताना अजित पवारांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला विरोध करण्याची भूमिका विजय शिवतारेंनी घेतली होती. अनेक आठवड्यांपासून काहीही झालं तरी अजित पवारांविरोधात लढणारच असं सांगणाऱ्या शिवतारेंनी अचानक माघार घेतली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुती अडचणीत येत असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यांचं सांगणं मला पटलं. तसेच माझ्या मतदारसंघातील स्थानिकांसाठी काही प्रकल्प मंजुर करण्यात आल्याने आपण बारामती मतदारसंघातून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे असं शिवतारे यांनी स्पष्ट केलं. पत्रकारांशी बोलताना अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेल्या पुरंदरच्या तहाशी या तडजोडीची तुलना शिवतारेंनी केली.
"पालखीतळावर महिला दिनानिमित्त माझी मुलगी डॉक्टर ममता आणि इतर सहकाऱ्यांनी घेतला. तिथे चार ते पाच हजार महिला होत्या. मी पाहुणा म्हणून तिथे गेलो आणि मला तिथे जाणवलं की मी बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा विचार करतच होतो. मात्र तिथे साक्षात्कार झाल्याप्रमाणे मी उस्फुर्तपणे बोललो. आता ही वेळ आली आहे 5 लाख 50 हजार पवारविरोधी मतदान या नणंद-भाऊजय असतील तर कोणाला होणार? अशाप्रकारचा विचार केल्यानंतर लोकशाहीमध्ये मतदारांना त्यांच्या चॉइसचा उमेदवार द्यावा या परमोच्च हेतूने मी ही निवडणूक लढणार असं जाहीर केलं. त्यानंतर सर्वच प्रसारमाध्यमांनी ते दाखवलं. गेली 15 दिवस कुठल्याही प्रकारे ही निवडणूक लढायचीच या निर्णयावर आम्ही होतो. शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन मी चर्चा केली. मी त्यांना नीड समाजलं. मी लढलो तर काय झालं असतं, मी खासदार झालो तरी काय झालं असतं. आपल्याकडे कोणाचं कनेक्ट नसता तर काय झालं असतं. लोकांचं किती नुकसान झालं असतं, पुढच्या पिढ्यांचं किती नुकसान झालं असतं हे सगळं सांगितलं," असं शिवतारे म्हणाले.
"माझी उप-मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांशी फोनवर दोनदा चर्चा झाली. प्रत्यक्षात चर्चा झाली तरी मी माझा विचार बदलला नव्हता. बारामती विधानसभा मतदारसंघातून लोकांचा पाठिंबा होता. दौंड, इंदापूर, भोर, पुरंदर, खडकवासला सगळीकडून मला एक अंडर करंट दिसला. अगदी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारीही यात सहभागी होते. भाजपाचे, काँग्रेसचेही काही पदाधिकारी या लढ्यात सहभागी होते. मात्र खदगावकर म्हणून मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आहेत, त्यांचा फोन आला. मी ऐकतचं नाही म्हणून मुख्यमंत्री एकदा माझ्यावर रागवलेही. पण तरीही मी निघून आले. मग 27 तारखेला खदगावकरांचा फोन मला आला. मुख्यमंत्र्यांना, महायुतीला तुमच्यामुळे अडचण होत आहे. सर्व ठिकाणी एकमेकांविरोधात अपक्ष उमेदवार केले तर 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना संभाळायचं आहे. मुख्यमंत्र्यांना विजय शिवतारे ऐकत नाही यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून काही ऐकावं लागेल हे त्यांनी मला जेव्हा सांगितलं. तेव्हा क्षणार्धात मुख्यमंत्र्यांची आणि महायुतीची अचडण होतेय. एका स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित लक्षात घेत मी निर्णय घेतला. तसेच मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी देशाची सत्ता भाजपाला द्यावी यामध्ये माझ्या हातून काही प्रमाद घडला तर तो इतिहासात लिहिला जाईल. म्हणून मी त्या फोननंतर मुख्यमंत्री गुजरात की राजस्थानला गेलेले त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. मुख्यमंत्री खुश झाले. चांगला निर्णय घेताय. तो सर्वांच्या हिताचा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले," असंही शिवतारेंनी सांगितलं.
नक्की वाचा >> 'गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला'; शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपा नेत्याचा आरोप
"28 तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी रात्री 11 ते 2 अशी चर्चा झाली. मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं. नंतर माझंही म्हणणं मांडलं. कशामुळे काय झालं ते निगेटीव्हली बोलणार नाही. मला शारीरिक त्रास झाला. माझं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं. माझ्या लोकांचं नुकसान झालं. माझं विमानतळ रखडलं, गुंजवणीचा प्रकल्प रखडला, राष्ट्रीय बाजार प्रकल्प रखडला. हे मी जर आमदार असतो तर पूर्ण पाणी फिरलं असतं. जर मी आमदार असतो तर पाठी लागून ते झालं असतं. नाही झालं, काही हरकत नाही. कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. मी माझ्या प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. मी माझं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं आहे. जसा इतिहासात पुरंदरचा तह आहे तसा हा तह झाला तर त्यामधून चांगल्या गोष्टी मिळाल्या तर त्याचा आनंद आहे. आम्ही राजकारण लोकांच्या हितासाठीच करत असतो," असं शिवतारे म्हणाले. "गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलं आहे. 1360 कोटींच्या पाईपलाईनची मी ऑर्डर दिली आहे. मात्र तो प्रकल्प 4 वर्ष उशीर झाल्याने खर्च वाढला आहे. भोरच्या शेतकऱ्यांसाठी 3 उपसा सिंचन प्रकल्प आणि गुंजवणीच्या पाईपलाईनसाठी 1782 कोटींची सुधारित मंजुरी देऊन काम करुन घ्यावं अशी माझी मागणी मान्य करण्यात आली आहे," असं शिवतारेंनी सांगितलं.