`राष्ट्रवादीला सोबत घ्यायची गरज नव्हती` म्हणणाऱ्या गोगावलेंना अजित पवारांचे खास शैलीत उत्तर
Ajit Pawar Reaction On Bharat Gogawale: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला सोबत घेण्याची गरज नव्हती असे ते म्हणाले होते. यावर थेट अजित पवारांनीच उत्तर दिलंय.
Ajit Pawar Reaction On Bharat Gogawale: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटाने आपला पहिला उमेदवार जाहीर केलाय. रायगडमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरेंना उमेदवारी देण्यात आलीय. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी राष्ट्रवादीबद्दल विधान केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला सोबत घेण्याची गरज नव्हती असे ते म्हणाले होते. यावर थेट अजित पवारांनीच उत्तर दिलंय.
काय म्हणाले होते गोगावले?
राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती, असे धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले होते. यातून राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने अडचण होत असल्याची कबूली गोगावलेंनी दिली होती. दोघांचे सरकार व्यवस्थित चालले होते. काही राजकीय गणिते करून त्यांना सोबत घेतलं आहे.आता सोबत घेतलंय तर त्यांनाही आपल्या बरोबरीने वागवणे गरजेचं आहे. हेवेदावे असतील ते बाजूला ठेवले पाहिजेत. आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, नवीन सत्ता स्थापन केली तेव्हा तटकरे, अजित पवार आमच्या सोबत नव्हते. पण आता सोबत आलेत तर हातात हात घालून चालतोय. त्यामुळे विजय शिवतारे यांनीही आता हातात हात घालून अजित पवार यांच्यासोबत चालावं, असे गोगावले म्हणाले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर, महाराष्ट्रात धनंजय मुंडेंना सर्वात मोठी जबाबदारी
अजित पवारांनी काय दिलं उत्तर?
गोगावलेंच्या राष्ट्रवादीबद्दलच्या विधानासंबंधी अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. खालच्या कार्यकर्त्यांना काही वेगळ वाटू शकतं. तसे ते बोलतात. मात्र राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा होऊन झालेला आहे, असे अजित पवार म्हणाले.
कोणाला सोबत घ्यायचे कोणाला नाही याबाबत चे निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात. राष्ट्रवादीप्रमुख म्हणून मी, शिवसेनाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे, रासप प्रमुख म्हणून जानकर आणि भाजपमधून फडणवीस, अमित शहा हे निर्णय घेत असतात. यापेक्षा कोण दुसरं असेल तर मला सांगा? असा प्रश्न त्यांनी विचारला. याव्यतिरिक्त जर कोणी काही बोलत असेल तर त्यानं तो अधिकार दिला आहे का? हे कळलं तर माझ्या ज्ञानात भर पडेल, असे अजित पवार म्हणाले.