LokSabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील सभेत बोलताना शरद पवारांचे आभार मानले आहेत. जे आम्हाला इतकी वर्षं जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं असं म्हणत त्यंनी शरद पवारांचे आभार मानले. भाजपाने वर्ध्यात रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. तसंच सध्या मोदींची लाट नसून, त्सुनामी आहे असं सांगत रामदास तडस यांना 60 टक्के मतं मिळतील असा विश्वास व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी शरद पवारांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही, ती शरद पवारांनी करुन दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. जिल्हा परिषद, आमदारकी, नगरपालिका, नगरपरिषद जिंकलो. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. शरद पवारांचे मनापासून आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब करुन दाखवला. शरद पवारांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं. ज्या महात्मा गांधींचं नाव वारंवार सांगून काँग्रेसने इतकं वर्ष राजकारण केलं, त्याच गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करुन दाखवलं. यासाठी मला त्यांचे आभार मानायचे आहेत," असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 


"काँग्रेसला उमेदवार सापडेना, कोणी उभं राहायला तयार नव्हतं. मग एक उमेदवार त्यांनी काँग्रेसमधून आयात केला. त्यांनीही विधानसभेत टिकावं लागणार नाही, यासाठी किमान लोकसभेत शहीद होऊन मोठं व्हावं यासाठी राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं. गांधींजींचं वर्धा हे ना काँग्रेसचं, ना शरद पवारांचं. ते मोदी आणि भाजपाचं आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे," असंही ते म्हणाले. 


"रामदास तडस यांनी गेल्या 10 वर्षात सातत्याने सर्वसामान्यांसाठी भूमिका घेतली. ते लोकांसाठी उपलब्ध होते. म्हणून जनतेचं विलक्षण प्रेम त्यांना मिळालं आहे. रामदास तडस पैलवान असून, कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कुस्तीगीर परिषदेवर इतकं वर्ष शरद पवारांचं पॅनेल होतं. पण या पैलवानाने असा डाव टाकला की कुस्तीगीर परिषद त्यांच्या हातात आली. त्यांचा चेहरा भोळा असून, सगळे डावपेच माहिती आहेत," असं कौतुक त्यांनी केलं. 


पुढे ते म्हणाले की, "मागील निवडणुकीत रामदास तडस यांना 52 टक्के मतं मिळाली होती. तेव्हा तर मोदी लाट होती. पण यावेळी त्सुनामी आहे. त्यामुळे रामदास तडस यांना 60 टक्के मतं घ्यावीच लागतील. त्यांना लोकांचा आशीर्वाद मिळेलच". 


नरेंद्र मोदींनी देशात विकासाचा अजेंडा राबवला. 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबी रेषेतून बाहेर आले. जगातील सर्व अर्थतज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत असून, अभ्यास करत आहेत. नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्थेला 11 व्या स्थानावरुन पाचव्या स्थानी आणलं असं फडणवीस म्हणाले.