ठाणे मतदारसंघ का सोडला? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट, म्हणाले `मुख्यमंत्र्यांनी...`
Devendra Fadnavis on Thane: लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन घोडं अडलं होतं. यामध्ये ठाणे (Thane) मतदारसंघाचाही समावेश होता. भाजपाने ठाणे मतदारसंघ मिळावा यासाठी आग्रही होतं. पण अखेर एकनाथ शिंदेंच्या (Ekanth Shinde) शिवसेनेला (Shivsena) हा मतदारसंघ मिळाला आहे.
Devendra Fadnavis on Thane: लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन चांगलीच रस्सीखेच सुरु होती. यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे (Thane) मतदारसंघाचाही समावेश होता. एकीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना मतदारसंघावर दावा करत असताना दुसरीकडे भाजपही या मतदारसंघासाटी आग्रही होती. पण अखेर एकनाथ शिंदेंच्या (Ekanth Shinde) शिवसेनेला (Shivsena) हा मतदारसंघ मिळाला असून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नरेश म्हस्के यांच्यासमोर ठाकरे गटाचे राजन विचारे यांचं आव्हान आहे. दरम्यान ठाणे मतदारसंघाचा आग्रह का सोडला याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
ठाणे मतदारसंघ न मिळाल्याने भाजपा समर्थक नाराज असल्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कोणत्याही पक्षाला आपल्याला जास्त जागा मिळाव्यात असं वाटणं साहजिक आहे. आम्हाला 30 जागांची अपेक्षा होती, पण 28 मिळाल्या. आम्ही ठाणे मिळण्यासाठी आग्रही होतो. पण मुख्यमंत्री म्हणाले की, ही जागा आम्ही सातवेळा जिंकली आहे. जर मी आनंद दिघेंचा मतदारसंघ जाऊ दिला तर माझ्या समर्थकांचं खच्चीकरण होईल. आम्ही ठाण्यासाठी आग्रह करु नये अशी त्यांनी विनंती केली".
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरेंवरही टीका केली. त्यांना भावनिक साथ मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. "काही उमेदवारांसाठी भावनिक लाट असेल, पण पूर्णपणे नाही. शरद पवारांनी पक्ष आणि घरं फोडली आहेत. आपला वारसा आपल्या मुलांकडे देण्याची इच्छा असल्यानेच त्यांचे पक्ष फुटले. दुसऱ्याला व्हिलन करुन कोणी हिरो होत नाही. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंकडे वारसा सोपवायचा असल्याने अजित पवारांना व्हिलन करण्यात आलं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षवाढीसाठी काम केलेलं असतानाही त्यांचे पंख छाटून आदित्य ठाकरेंना पुढे आणलं जात होतं," अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
मराठी मतदार शिवसेनेसह आहे ही फक्त अफवा आहे असंही ते म्हणाले आहेत. "मराठी मतदार फक्त ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी आहे ही अफवा आहे. 2017 च्या पालिका निवडणुकीत आम्ही 82 जागा जिंकलो होतो. 2014 मध्ये आम्ही वेगळे लढलो आणि भाजपाला त्यांच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या. 2019 मध्ये आम्ही एकत्रित लढलो तेव्हा सेनेकडे 1 जागा जास्त होती. पण ते आमच्यापेक्षा 5 जागा कमी जिंकले. मीदेखील मराठी आहे आणि आशिष शेलारही आहेत. लोकांनी आम्हाला सतत मतदान केलं आहे. नरेंद्र मोदींची प्रसिद्धी जात आणि भाषेच्याही पुढे आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.