Uttamrao Jankar : बारामतीसोबत आता माढ्यातील लोकसभा निवडणुकीत देखील राजकीय वातावरण तापत चाललं आहे. अशातच शरद पवार यांनी महायुतीला दोन्ही ठिकाणी मोठा झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रमुख नेते उत्तमराव जानकर हे शरद गटात सामील होणार आहेत. जानकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांना जनतेचा चांगला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक जागांवर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे आता महायुतीला याचा मोठा फटका बसणार आहे. यासोबत अजित पवारांचा पराभव केल्यानंतर पक्ष सोडणार असल्याचे उत्तमराव जानकर यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तमराव जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील अनेक समर्थकांसह शरद पवार गटात सामील होणार आहेत. जानकर यांचा सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. अशा स्थितीत उत्तम जानकर यांनी पक्षप्रवेश केल्याने सोलापूर आणि माढा येथील भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांचे 30 वर्षांचे कट्टर राजकीय वैर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने संपवले. त्यानंतर बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असा इशारा उत्तमराव जानकर यांनी दिला आहे. उत्तमराव जानकर हे शरद पवारांना जाऊन मिळाल्याने त्यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेतली आहे.


माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी शुक्रवारी निर्णायक मेळावा घेतला. जानकर यांना समर्थन देण्यासाठी हजारो समर्थक वेळापूर मध्ये जमा झाले होते. उत्तमराव जानकर यांनी बोलावलेल्या बैठकीला जयंत पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सहकार महर्षीचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. यावेळी भाजपने आज पर्यंत फसवणूक केली आहे, अशी भावना कार्यकत्यांनी बोलून दाखवली. यासोबत जानकर समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे जायचे नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे जानकर यांनी मोहिते पाटील यांच्या पाठीमागे आपली ताकत लावत महायुतीसमोरील आव्हान वाढवलं आहे. सहा महिन्यापासून यासाठी पडद्यामागे प्लॅनिंग सुरू असल्याचा गौप्यस्फोट उत्तमराव जानकर यांनी केला आहे.


काय म्हणाले उत्तमराव जानकर?


"बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव करेपर्यंत मी अजित पवार गटात आहे. अजित पवारांचा पराभव करुन त्यांचा गट सोडणार आहे," असे उत्तमराव जानकर यांनी म्हटलं आहे.