LokSabha Election: आताचे महाराज खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीने कोल्हापुरातून उमेदवारी दिलेले शाहू महाराज यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं ते म्हणाले आहेत. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीने कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता व्यक्त होत होती. पण भाजपाने संजय मंडलिक यांना मैदानात उतरवलं आहे. यानंतर भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. अशाच प्रचारसभेदरम्यान संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. सध्याचे शाहू महाराज हे खरे वारसदार नसून, गादीवर दत्तक आले आहेत असं म्हटलं. 


संजय मंडलिक काय म्हणाले?


"आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का?  ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे आपण कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूरोगामी विचार जपला," असं संजय मंडलिक म्हणाले आहेत. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार?  अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. 


सतेज पाटलांचा संताप


मंडलिक स्वत:च्या स्वार्थासाठी अशी विधानं करत आहेत. निवडणूक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शाहू महाराजांवर होणारी असली टीका आम्ही सहन करणार नाही अशा शब्दांत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपाने त्यांना जाब विचारला पाहिजे. तुम्हाला कोणी चिठ्ठी लिहून दिली का? हे विचारा. कोल्हापूरकर त्यांना उत्तर देतील. याचे पडसाद फक्त कोल्हापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


राज्यातील मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी याची दखल घेतली पाहिजे. या विधानावर खुलासा कऱणं गरजेचं आहे. त्यांनी सुरुवात केली आहे, आम्ही शेवट करु असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला आहे. 


प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर



"छत्रपतींच्या घराण्याचा अवमान करण्याचे संजय मंडलिक यांच्या मनात असू शकत नाही. अनेकदा राजघराण्याविषयी अशा प्रकारचे बोलले गेले आहे. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. 
संजय राऊत वंशजांचे पुरावे द्या म्हटले होते हे कुठल्या संस्कृतीत बसते. राज्याचे जाणते राजे शरद पवार पूर्वी बोलले होते छत्रपती पेशवे नेमायचे. पण ज्यावेळी संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली त्यावेळी पवार म्हणाले आता पेशवे छत्रपतींना नेमणूक द्यायला लागलेत. निवडणूक आली म्हणून भावनिक वातावरण करून मतदानात काय रूपांतरित करता येतेय का? याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे," असं प्रत्युत्तर प्रवीण दरेकरांनी दिलं आहे.