`धमक्या देणाऱ्यांना सरळ करा`, म्हणणाऱ्या शरद पवारांना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले `जर मी धमकी दिली असेल...`
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून (Ajit Pawar) मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. जाहीर सभेत त्यांनी धमकीचा मजकूर लिहिलेली चिठ्ठीच वाचून दाखवली.
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून (Ajit Pawar) मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. शरद पवारांनी बारामतीमधील सुपे येथील सभेत धमकीचा मजकूर लिहिलेली चिठ्ठी वाचून दाखवली. यावेली त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देताना, 'अशा धमक्यांना घाबरु नका, आता त्यांना सरळ करण्याची वेळ आली आहे' असं म्हटलं. दरम्यान या आरोपांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया
अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धमकीच्या आरोपावर उत्तर दिलं. ते म्हणाले की, "तुम्ही लोक मला किती वर्षं ओळखता. जर कोणी अशा धमकावण्याचे प्रकार केले असते तर मला जनतेचा इतका मोठा पाठिंबा मिळाला नसता. संस्था संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते आणि राजकारण राजकारणाच्या पद्दतीने करायचं असतं. जर मी कोणाला धमकावलं असेल तर त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करा. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन पुढील कारवाई करावी".
शरद पवारांनी काय म्हटलं?
शरद पवार बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा करण्यासाठी पोहोचले होते. सुपे येथील सभेत त्यांनी धमकीची चिठ्ठी वाचून दाखवली ज्यामध्ये लिहिलं होतं की, "घड्याळाला मतदान केलं नाही, तर पाणी मिळणार नाही. कारखान्याला ऊस जाणार नाही". मी गेली 20 वर्षं स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो, पण आता लक्ष घालून जबाबदारी पार पाडेन असं आश्वासनही शरद पवारांनी दिलं आहे.
"अनेकजण माझं 84-85 वय झाल्याचा उल्लेख करत आहेत. तुम्ही माझं वय काढू नका, तुम्ही अजून काय पाहिलं आहे? हा गडी थांबणारा नाही. ज्यांनी साथ दिली त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामं करणार," असा निर्धारच शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
'लेकीला निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या'
अजित पवार यांनी बारामतीमधील सभेत लेकीला निवडून दिलं आता सूनेला निवडून द्या असं आवाहन केलं. "अनेकांसमोर बाकी प्रसंग उभा राहिला आहे. तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीमागे उभे राहिला आहात. ज्या ठिकाणी पवारांचं नाव असेल त्याच्या समोरचं बटण दाबायचं आहे. 1991 ला मला निवडून दिलं. त्यानंतर वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिलं. आता लेकीला (सुप्रिया सुळे) निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या म्हणजे मुलगा वडील लेक आणि सूनही खुश," असं मिश्कीलपणे अजित पवार म्हणाले आहेत.