LokSabha Election: आताचे महाराज (शाहू महाराज) खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान भाजपाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी केलं असून त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. संजय मंडलिक यांच्या विधानावर टीका होऊ लागली असून, शरद पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पण हा सगळा प्रचार राजकारण किती खालच्या पातळीवर चालू आहे हे दाखवणारा असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"संजय मंडलिक काय म्हणाले हे मला माहित नाही. राजघराण्यात दत्तक घेणं हे काही नवीन नाही. तशी अनेक उदाहरणं आहेत. पण दत्तक घेतल्यानंतर ती व्यक्ती त्या घराण्याचा सदस्य, प्रतिनिधी होतो. अशा विधानांवर राजकारण किती खालच्या स्तरावर जात आहे याचं मूर्तीमंत उदाहरण आहे," असं शरद पवार म्हणाले आहेत. 


"शाहू महाराज हे जनमाणसात आदरणीय व्यक्तिमत्व आहे. अनेक संस्थांचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. मूळ शाहू महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर ते काम करत आहेत. अशा व्यक्तिमत्वाच्या संबधी असं विधान करत विरोधक आपली मानसिकता दाखवत आहेत," अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे. 


संजय मंडलिक नेमकं काय म्हणाले आहेत?


"आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का?  ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे आपण कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूरोगामी विचार जपला," असं संजय मंडलिक म्हणाले आहेत. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार?  अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. 


भाजपानेही दिली प्रतिक्रिया


"छत्रपतींच्या घराण्याचा अवमान करण्याचे संजय मंडलिक यांच्या मनात असू शकत नाही. अनेकदा राजघराण्याविषयी अशा प्रकारचे बोलले गेले आहे. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. 


संजय राऊत वंशजांचे पुरावे द्या म्हटले होते हे कुठल्या संस्कृतीत बसते. राज्याचे जाणते राजे शरद पवार पूर्वी बोलले होते छत्रपती पेशवे नेमायचे. पण ज्यावेळी संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली त्यावेळी पवार म्हणाले आता पेशवे छत्रपतींना नेमणूक द्यायला लागलेत. निवडणूक आली म्हणून भावनिक वातावरण करून मतदानात काय रूपांतरित करता येतेय का? याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे," असं प्रत्युत्तर प्रवीण दरेकरांनी दिलं आहे.