Sharad Pawar on Shashikant Shinde: शरद पवार (Sharad Pawar) गटाने सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे. दरम्यान शशिकांत शिंदे यांना मुंबई पोलीस नोटीस बजावणार असल्याची चर्चा आहे. कोरेगावमधील आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी दोन पत्रकार परिषदा घेऊन वातावरण गरम केलं आहे. त्यात उदयनराजे यांनीही शशिकांत शिंदे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत रान  पेटवलं आहे. त्यातच आता शरद पवारांनी महायुतीला जाहीर इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे. तुम्ही दिलेली साथ विसरणार नाही असंही शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना म्हटलं आहे. 


"दिल्लीत केजरीवाल यांनी चांगलं काम केलं. मोदी सरकारच्या विरोधात बोलल्याने ते तुरुंगात आहेत. चांगलं काम करणारे राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख तुरुंगात होते.संजय राऊत तुरुंगात होते.  शशिकांत शिंदे बाजार समितीमध्ये चांगलं काम करत आहेत. मात्र त्यांनाही काही करुन अडवलं जात आहे. त्यांना निवडणुकीत थांबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जर शशिकांत शिंदे यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा शरद पवारांनी जाहीर सभेतून दिला आहे. 


मी या मतदारसंघातुन उभा असताना तुम्ही मला साथ दिली होती हे मी विसरणार नाही. आताही अशीच साथ द्या असं आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं. 


"महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे इतर देशांचंही लक्ष आहे. इतर देशांनी या देशाची लोकशाही पाहिली आहे. यंदा स्थिती वेगळी आहे. आजच्या पंतप्रधानांचा संवादावर विश्वास नाही. विरोधी पक्षांसोबत बोलत नाहीत. 10 वर्षात मोदींनी एकदाही पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली नाही. सभागृहात येतात आणि 1 ते दीड तासात विषय मांडून जातात. अशा लोकांना हातात सत्ता द्यायची का याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे," असंही शरद पवार म्हणाले. 


लोकसभेची  निवडणूक आली आणि सगळ्या जगाचं लक्ष महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे ?  अमेरिकेचे लोक, इंग्लंडचे लोक त्यांचे प्रतिनिधी लोकशाहीच्या दृष्टीने  अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून  घेण्यासाठी आज या ठिकाणी येत आहेत असंही शरद पवार म्हणाले. 


आज आपण बघतो आहोत की, या देशामध्ये एका व्यक्तीच्या  हातामध्ये गेल्या दहा वर्षापासून देशाची सत्ता आहे आणि त्या व्यक्तीचं नाव  नरेंद्र मोदी. मुख्यमंत्री होते, आरएसएसचं काम करत होते. त्यांना  मंत्रिमंडळामध्ये जाऊन देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, पाच वर्ष  झाली, दहा वर्ष झाली आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याची  संधी द्या, यासाठी ठिकठिकाणी जाऊन ते सांगतात, त्यांचे सहकारी सांगतात. पण  त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.