Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक दिल्लीसाठी रवाना झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. काही दिवसांपुर्वी मनसे नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. मनसे आणि आमच्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकमत असल्याचे भाजप नेते वारंवार सांगत आले आहेत.असे असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाषणांतून सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर उघडपणे टीका करत आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे 'एकला चलो'ची भूमिका घेतील, असेही वाटले होते. पण राज ठाकरे अचानक दिल्लीला गेल्याच्या बातम्या आल्याने भाजपसोबत युतीच्या चर्चेला वेग आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे दिल्लीला पोहोचले तेव्हा त्यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील त्यांच्यासोबत होते. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे असे राज्यातील महत्वाचे नेतेही उपस्थित आहेत. यासोबत राज ठाकरेंना या बैठकीचे निमंत्रण गेल्याने महायुतीत मनसेला स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. 


कसा असेल फॉर्म्युला?


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एकही खासदार नाही. असे असले तरी मुंबई-नाशिकमध्ये पक्षाची ताकद आहे. राज ठाकरेंचा स्वत:चा करिश्मा आहे. टोल, मशिदीवरील भोंगे हटवणे अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भूमिका घेतली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे-भाजप एकत्र येण्याची शक्यता आहे. महायुतीकडून मनसेला 1 ते 2 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यात शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईतील जागा मनसेला दिली जाण्याची शक्यता आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी तत्कालिन आमदार दगडू सकपाळ यांच्याविरोधात निवडणूक लढवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिण मुंबई मतदार संघातून बाळा नांदगावकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.  


काय म्हणाले राज ठाकरे?



राज ठाकरे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. दिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंना तुमचं शेड्यूल्ड काय आहे? महायुतीत सामील होणार का? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'माझं शेड्युल्ड काय आहे अद्याप मला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. मला फक्त 'या म्हणून' सांगितलंय. आता दिल्लीत आलोय. पाहू ! अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली. 
 


'योग्य तो सन्मान राखू'


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. मागच्या काळात त्यांचे आणि आमच्या पक्षाचे अनेक मुद्द्यावर एकमत झाले आहे. त्यांनी कट्टर प्रांतवादाची भूमिका सोडली आणि हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतली तर ते नक्कीच आमच्यासोबत असतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून येत आहे. तसेच राज ठाकरेंचा योग्य तो मान राखला जाईल,असेही त्यांनी सांगितले.