LokSabha Election: लोकसभा निवडणुकीतील निकालाने महाराष्ट्रात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. देशात 400 पारची घोषणा देणाऱ्या भाजपाला देशपातळीसह महाराष्ट्रातही मोठा फटका बसला आहे. राज्यात अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला असून, 4 पैकी एकच जागा जिंकता आली आहे. यानंतर अजित पवार गटाकडून निकालाचा आढावा घेतला जात आहे. तर दुसरीकडे काही आमदार पुन्हा शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता असल्याचे दावे होत आहेत. यादरम्यान आता आमदारांनी पराभूत झालो तरी साथ सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटेल ट्रायडंट येथे अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक सुरु आहे. यावेळी आमदारांनी पराभूत झालो तरी चालेल, पण अजित पवारांची साथ सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. कुठलाही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नसून त्या केवळ अफवा असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं आहे. गेल्या तीन तासांपासून लोकसभा निवडणूक निकालावर विचारमंथन सुरु आहे. 


5 आमदार बैठकीला गैरहजर


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबईत सकाळी बैठकीला हजर असलेले आमदार संध्याकाळच्या बैठकीला गैरहजर होते. संध्याकाळच्या बैठकीला अमदार अनुउपस्थित असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाची धाकधुक वाढली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच आमदार गेले कुठे? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे आणि अण्णा बनसोडे अशी बैठकीला दांडी मारणाऱ्या पाच आमदारांची नावे आहेत. धर्मराव बाबा आत्राम यांनी  आजारी असल्याच कळवलं आहे. नरहरी झिरवळ हे  रशियाला गेले आहेत. सुनील टिंगरे यांनी देखील कामानिमित्ताने बाहेर असल्याचे कळवले आहे. राजेंद्र शिंगणे यांनी आजारी असल्याचे कारण दिले आहे. अण्णा बनसोडे यांनी देखील काही कारणानिमित्ताने बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले आहे. 


दरम्यान आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची अफवा असल्याचं सुनील तटकरे म्हणाले आहेत. "आमचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा जाणुनबुजून पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत आणि एक टीम आहोत. अशा अफवा आणि खोटे व्हिडीओ निवडणुकीच्या वेळीही पसरवले जात होते." असं सुनील तटकरे यांनी कोअर टीम बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.


“आम्ही विधानसभा निवडणूक आक्रमकपणे लढू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतील," असं ते म्हणाले.