PM Narendra Modi Mumbai Road Show: नरेंद्र मोदी (Narendra Modi) मगरीचे अश्रू ढाळणारे आणि नौटंकी करणारे गृहस्थ आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून घाटकोपर आणि विक्रोळीत रोड शो पार पडणार आहे. यावरुनही संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली असून भाजपा आता पराभवाच्या भीतीने त्यांना गल्लोगल्ली फिरवत आहे असा टोला लगावला. घाटकोपरमधील होर्डिंग पडलं ते बेकायदेशीर असून त्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"हे सर्वजण निवडणूक माफिया आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना निवडणूक जिंकायची आहे. आज मोदी नाशिकमध्येही आहेत. यानंतर रोड शो करणार आहेत. मग पंतप्रधानांचं काम कधी कऱणार आहेत. दिल्लीत ते कधी बसतात. निवडणुकीसाठी संपूर्ण दिवस तर रस्त्यावर फिरत आहेत. हे पंतप्रधानांचं काम नाही. याआधीही ते महाराष्ट्रात आले आहेत. पण पूर्ण दिवस, 8 दिवस रस्त्यावर फिरणारे हे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रात पराभवाची भीती आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. जिथे जिथे मोदी जातील तिथे महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. 


"तुम्ही 1 नाही आणि 4 रोड शो करा. पण नरेंद्र मोदी जाणार तिथे आम्ही जिंकणार हे सूत्र आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मोदी नको अशी घोषणा दिली आहे. आतापर्यंत जिथे मतदान झालं आहे, तेथील 90 टक्के जागा आम्ही जिंकणार आहोत," असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 


पुढे ते म्हणाले की, "होर्डिंग पडलं ते बेकायदेशीर असून त्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे. मुंबईत जिथे होर्डिंग पडलं तिथेच नरेंद्र मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री देशभरात रोड शो करतात. दुसऱं काही काम नाही का? मणिपूरमध्ये गेले नाहीत. जम्मू काश्मीरात काश्मिरी पंडितांचे अश्रू पुसायला गेले नाहीत. आज घाटकोपरमध्ये जाऊन तिथे नाटक करतील".


"महाविकास आघाडीने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर आणलं आहे. भाजपावाले पराभवाच्या भीतीने पंतप्रधानांना रस्त्यांवर, गल्लीगल्तीत फिरवत आहेत. मुंबईतल्या 6 जागांवर आम्ही लढत आहोत. त्यातील सहाच्या सहा जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. नरेंद्र मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागत आहे. तुमच्यावर दारोदार भटकण्याची, रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे लोकांना कळू द्या," असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.