`बारामतीत मध्यरात्रीपर्यंत बँक उघडी होती,` शरद पवारांचा गंभीर आरोप, `महाराष्ट्रात कधी इतका पैसा...`
निवडणुकीत सत्ताधा-यांकडून कधी नव्हे इतका पैसा वाटला गेल्याचा आरोप शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. बारामतीत मध्यरात्रीपर्यंत बँक उघडी होती. असं कधी ऐकलं नव्हतं अशी टीकाही शरद पवारांनी (Sharad Pawar) केली आहे.
निवडणुकीत पैसेवाटप झाल्यासंबंधीही शरद पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. या निवडणुकीत सत्ताधा-यांकडून कधी नव्हे इतका पैसा वाटला गेला. बारामतीत मध्यरात्रीपर्यंत बँक उघडी होती. असं कधी ऐकलं नव्हतं अशी टीका शरद पवारांनी केली आहे. 'झी २४तास'चे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत शरद पवारांनी हे आरोप केले आहेत.
माढा, बारामती अशा मतदारसंघांबद्दल तुमचा काय अंदाज आहे असं विचारण्यात आलं असता शरद पवार म्हणाले की, "या सर्व भागांमध्ये आम्हाला यश मिळेल. या निवडणुकीत मी पहिल्यांदाच कधी नव्हे इतका पैसा वाटल्याचं पाहिलं. पैशाचं वाटप अशी गोष्ट आम्ही आधी ऐकली नव्हती. बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री 2 वाजता बँक उघडी आहे आणि त्यात 30 ते 40 लोक असून पैशांचे व्यवहार सुरु होते. अखेर पोलिसांना कारवाई करावी लागली. बँकेच्या मॅनेजरला अटक कऱण्यात आली. हे कधी ऐकलं होतं का?".
'बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस', 'मध्यरात्रीनंतरही बँक सुरु'; कारमध्ये 500 च्या नोटा
महाराष्ट्रात असा प्रकार कधी पाहण्यात आला नव्हता. सरसकटपणे घरोघरी जाऊन पैसे वाटले जात असल्याचं कधी पाहिलं नव्हतं. सत्ताधाऱ्यांमध्ये आत्मविश्वास नसल्याने हे सर्व दिसत आहे. पैसे वाटण्याशिवाय पर्याय नाही असं त्यांना वाटत आहे असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
बारामतीत नेमकं काय झालं होतं?
बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवार यांनी यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केले होते. बारामतीमध्ये बँक मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही सुरु होती असा दावा करणारा एक व्हिडीओही रोहित पवारांनी पोस्ट केला होता. त्याचप्रमाणे कारमधून पैशांचा वाटप केलं जात होतं हे दाखवणारे काही व्हिडीओ त्यांनी पोस्ट केले होते. या प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी थेट अजित पवार गटाचा हात असल्याचा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला होता.
"पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा," अशा खोचक कॅप्शनसहीत रोहित पवार यांनी या बँकेची शाखा रात्रीही सुरु होती असा दावा करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी, "निवडणूक आयोग दिसतंय ना?" असा सवालही विचारला. "सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल," असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.