Sharad Pawar on Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी अशी टीका केल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादीला नकली म्हणणं हा पोरकटपणा आहे, अशा शब्दात शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'झी २४तास'चे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत शरद पवारांनी मोदींच्या विधानावर जोरदार हल्लाबोल केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी असा उल्लेख करत आहेत असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार म्हणाले की, "पंतप्रधानांची पातळी कुठे गेली आहे हे यावरुन दिसत आहे. नकली शिवसेना म्हणण्याचं कारण काय? शिवसेनेतील एक गट शिंदेंच्या बाजूने गेला हे आपण समजू शकतो. आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या गेलो असता, अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडणारे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसैनिक दिसतात. त्यांनी एक आव्हान स्विकारलं आहे. सर्व शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन समाजकारण, राजकारणासाठी उतरले आहेत. मी त्यांच्यासाठी शब्द वापरणार नाही. पण दुसरं कोणी असतं तर नकली म्हणणं म्हणजे पोरकटपणा आहे असं म्हटलं असतं".


नकली राष्ट्रवादी आहे का हे निवडणुकीतून कळेलच असा सूचक इशाराही शरद पवारांनी यावेळी दिला आहे. दरम्यान यावेळी शरद पवारांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरुन पंतप्रधानांना सोयीचं होईल अशी निवडणूक टप्प्यांची आखणी केली गेली आहे असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला आहे. 


शरद पवारांच्या या आरोपावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, "निवडणुकीत जसाजसा पराभव दिसायला लागतो आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर जेव्हा ते पंतप्रधान होणार असल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या तेव्हा अशी कारणं मुलाखतीत दिली जातात. 1952 मध्ये पहिली निवडणूक झाली तेव्हा देशात काँग्रेसचं वातावरण होतं. ही निवडणूक 25 ऑक्टोबर ते 21 फेब्रुवारी अशी 4 महिने चालली होती. तेव्हाही अशाच प्रकारे काही लोकांनी आरोप केले असून आता त्याची रीघ ओढली जात आहे. पंडित नेहरुंच्या सोयीसाठी 4 महिने निवडणूक झाली असं सांगितलं. पण तेव्हा पंडित नेहरु आणि निवडणूक आयोगाने देशातील विविधता, आवश्यकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने नीट आणि निष्पक्ष व्हावी यासाठी 4 महिने घेतल्याचं सांगितलं होतं".  


"पंतप्रधानांसाठी पोरकटपणा शब्द वापरणं म्हणजे शरद पवार आता संजय राऊतांच्या मार्गावर निघालेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. शरद पवार मोठे नेते असून, त्यांनी पंतप्रधानांबद्दल बोलताना पोरकटपणा शब्द वापरण्याऐवजी नकली राष्ट्रवादी नाही इतकंच बोलायला हवं  होतं. आता जर एखाद्याने शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले तर भाजपा पदाधिकाऱ्याची जीभ घसरली असं म्हणू नका. त्यांनी संयमाने उत्तर देणं अपेक्षित आहे," असंही ते म्हणाले आहेत.