ठाण्यावरुन महायुतीत जुंपणार? प्रताप सरनाईक म्हणाले `ठाणे मतदारसंघ शिवसेनेचाच, आम्ही ठाम आहोत`
LokSabha Election: शिंदे गट आणि भाजपामध्ये ठाणे आणि कल्याण मतदारसंघावरुन अद्यापही वाद सुरु असल्याची माहिती आहे. भाजपाने ठाणे किंवा कल्याणपैकी एका मतदारसंघाची मागणी केली असताना, शिंदे गट मात्र दोन्ही जागा सोडण्यास इच्छुक नाही.
LokSabha Election: महायुतीमध्ये अद्यापही काही जागांवरुन चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असून यात ठाणे आणि कल्याण मतदारसंघाचा समावेश आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ सोडल्यानंतर भाजपा आता ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ मिळावा यासाठी इच्छुक आहे. पण शिंदे गट आपला बालेकिल्ला असणारा ठाणे मतदारसंघ सोडण्यास इच्छुक नाही. त्यात कल्याणमधून श्रीकांत शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार असल्याने तो मतदारसंघ सोडणं शिंदे गटाला परवडणारं नाही. यादरम्यान प्रताप सरनाईक यांनी ठाणे मतदारसंघ शिवसेनेचा असून, तो शिवसेनेलाच मिळाला पाहिजे असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मतदारसंघांसंदर्भातील चर्चा वेगवेगळ्या टप्प्यात आल्या आहेत. या आठवड्यात उर्वरित उमेदवारांची नावं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जाहीर करतील अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. प्रताप सरनाईक यांनी ठाणे मतदारसंघाबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "ठाणे जिल्ह्याचा 30 वर्षांचा इतिहास आहे. धर्मवीर आनंद दिघेंनी 1996 साली ही जागा पहिल्यांदा लढवली. प्रताप परांजपे खासदार झाले आणि तेव्हापासून ठाण्याची परंपरा आहे".
पुढे ते म्हणाले की, "धर्मवीर आनंद दिघे आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय अंतिम असतो. ठाणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यांच्यातील एक नाव एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर सैनिकाप्रमाणे त्यासाठी लढण्याची आमची तयारी आहे".
"ठाणे लोकसभा जागा शिवसेनेची आहे. धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांनी गेली अनेक वर्षं येथील धनुष्यबाण दिल्लीत पोहोचवण्याचं पवित्र काम केलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनेची असून, ती शिवसेनेलाच मिळावी यावर आम्ही ठाम आहोत. एकनाथ शिंदे ज्या उमेदवाराचं नाव जाहीर करतील त्याला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आणण्याचं काम सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही करु," असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. सर्व्हेचा रिपोर्ट बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. तसं असेल तर कार्यकर्त्यांची गरज काय? अशी विचारणाही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण काय?
"मिरा भाईंदरमधील शहरातील रस्त्याची कामं बंद पडली होती. राज्य सरकारच्या वतीने कर्जाला मंजुरी दिलेली असताना आयुक्तांनी ते कर्ज घेतलं नव्हतं. शहराची 15 लाख लोकसंख्या असताना निधीअभावी, आचारसंहितेच्या नावाखाली काम बंद पडल्याने लोकांच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतं. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आयुक्तांना फोन करुन पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं ताबडतोब करण्याचा आदेश दिला आहे," अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
"डोंगरी येथे उत्तनला एक डंपिग ग्राऊंड आहे. तिथे आग लागत असल्याने अनेक आजार बळावत आहेत. त्या लोकांनी मतदानावर 100 टक्के बहिष्कार टाकला आहे. खासदार, आमदार, नगरसेवक काम करत नसतील तर बहिष्कार का टाकू नये? असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. डोंबिवलीतील डंपिंग ग्राऊंड संदर्भात योग्य पाऊल उचवावं अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांशी चर्चा केली असून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे," असंही त्यांनी सांगितलं.