LokSabha Electio: महायुतीत शिंदे-गट आणि भाजपामध्ये अद्यापही काही जागांवरुन वाद सुरु असून, चर्चेचं घोडं अडलं आहे. भाजपाने ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ मागितला असून, शिंदे गटाची अडचण झाली आहे. दुसरीकडे भाजपाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. पण अखेर शिंदे गटासाठी त्यांनी मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पण नारायण राणे समर्थकांनी जागा सोडण्यास नकार दिला असून, प्रचाराची तयारीच सुरु केली आहे. दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय शिरसाट यांनी महायुतीत काही वाद नसून, एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असा दावा केला आहे. "आमच्यात आलबेल नाही, भांडणं आहेत, तक्रारी असा प्रकार नाही. याउलट युतीच्या अनेक महिने पूर्वीपासून आघाडीमध्ये चर्चेला सुरुवात झाली होती. पण  जिथून सुरुवात झाली तिथे आघाडी थांबली आहे. वंचित त्यांच्यापासून दूर गेली आहे. आता ती जवळ येणं शक्यत नाही हे स्पष्ट झालं आहे. काँग्रेसने शरद पवार गटाच्या चिन्हावर की शरद पवार गटाने काँग्रेसच्या चिन्हावर लढावं याची लढाई सुरु झाली आहे. उबाठा गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काही ठिकाणी नावांची घोषणा झाली असून, तिथेही वाद आहे. अशा स्थितीत आघाडी टीकेल की नाही हा संभ्रम लोकांमध्ये आहे. त्याउलट युती किती लवकर होईल आणि लवकर आम्हाला प्रचार करता येईल असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. येत्या 2 दिवसांत याचा शेवट होईल," असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. 


"नारायण राणे उद्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. याला खुलासा, निर्णय आणि त्यावर बोलण्याचा अधिकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. जर त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली तरी आम्ही युती म्हणून त्यांचं काम करु. पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागेवर आजही आमचा दावा आहे. ती जागा शिवसेनेला मिळावी असा आमचा आग्रह आहे. नारायण राणे यांचा मानसही दिसतोय. पण वरिष्ठ निर्णय घेईपर्यंत आम्ही काही बोलणार नाही," असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. 


"सर्वांनी ठरवून जाणकरांना परभणीची जागा दिली आहे. बाकी कोणत्याही जागेची बोलणी झालेली नाही. धाराशीव, हिंगोली जागा आमचीच आहे. तिथला उमेदवार जाहीर झाला आहे. संभाजीनगर आमची जागा असल्याने ती देण्याचा प्रश्न नाही. भाजपाने आम्हाला अडचणीत आणण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. हा सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे," अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. 


पुढे ते म्हणाले की, "हेमंत गोडसेंनी दोन वेळा ती जागा जिंकली आहे. शिवसेनेचा ती पारंपारिक जागा आजही आम्हाला मिळावी असा आमचा आग्रह आहे. उद्याही आहोत. पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचा हक्क सोडणार नाही. जागा आमचीच असून, आम्हाला मिळेल अशी आशा आहे कोल्हापूरचा उमेदवार बदलला जाणार नाही असं चित्र दिसत आहे. ती जागी इतर कोणाला पक्षाला जाणार नाही, यात कोणताही वाद नाही. जागा देणं, उमेदवार बदलणं यात फरक आहे".


"उद्धव ठाकरे गटाच्या घराला दरवाजाच राहिलेला नाही. दरवाजा तोडून सगळे बाहेर पळाले आहेत. अशा वल्गना करणं याचा अर्थ त्यांना कोणी विचारत नाही असा होत आहे. गद्दार तेच आहेत. खरा गद्दार संजय राऊत आहे. जे त्यांच्याकडे आहेत ते आमच्याकडे येण्याची शक्यता आहे," असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. 



"हिंगोली जागा शिवसेना लढवणार. नांदेड जागा भाजपची आहे. कार्यकर्त्यांनी विचलीत होऊ नये. कार्यकर्त्यांनी असंतोष करू नये, सबुरीने घ्यावे. उमेदवार बदलाबाबत निर्णय मुख्यमंत्री घेणार. युती धर्म सगळ्यांनी  पाळायला हवा. सर्वजण परिपूर्ण नसतात, वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. एकनाथ शिंदे साहेबांचे काय होईल याची चिंता संजय राऊतांनी करू नये जिथं खाता त्या पक्षाची चिंता करा. यांची वाकून पहायची सवय जात नाही," अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. 



"शरद पवार ज्येष्ठ आहेत, मात्र त्यांच्या राजकीय आखाड्यांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अनेकांचं राजकारण त्यांनी उध्वस्त केलं. ते बोलतील एक करतील एक असे आहे," असा टोला त्यांनी लगावला.