LokSabha Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेही उपस्थित होते. यानिमित्ताने मनसे भाजपाशी हातमिळवणी करणार असून, त्यांना लोकसभेसाठी 2 जागा मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण अद्याप भाजपा किंवा मनसेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक झाली. अमित ठाकरेही सोबत होते. महायुतीत सहभागी होण्यासंबंधी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. आणखी एका बैठकीनंतर यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या सकारात्मक चर्चा झाली इतकंच सांगू शकतो," असं बाळा नांदगावकर म्हणाले आहे. 


"लोकसभा निवडणूक असल्याने त्यासंदर्भातच चर्चा झाली. आम्ही कोणताही फॉर्म्यूला दिलेला नाही, पण नेमक्या किती जागा मिळाव्यात ही भावना सांगितली आहे. भाजपाला सांगण्यता आलं असून एक-दोन दिवसात माहिती आल्यानंतर सविस्तर सांगू," अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. 


तुम्हाला उमेदवारी देणार आहे का? असं विचारण्यात आलं असता बाळा नांदगावकर म्हणाले की, "कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. त्यासंबंधी आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. वरिष्ठ पातळीवर मात्र चर्चा झाली आहे. मी दोनवेळा लोकसभा लढवली आहे. आताही जर राज ठाकरेंनी गडचिरोलीतून निवडणूक लढण्यास सांगितली तर तिथून लढेन. कारण आम्हाला आदेश ऐकण्याची सवय आहे. त्यानुसारच वाटचाल करतो". उद्या राज ठाकरेंसह आमची बैठक होणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. 


संजय राऊत यांनी विचार करुन बोलायला हवं. दुसऱ्या पक्षावर टीका करताना विचार करायला हवा. आम्हाला काय भूमिका घ्यायची हे माहिती आहे. ते काय बोलतात याला आम्ही महत्व देत नाही असं प्रत्युत्तर त्यावेळी त्यांनी दिलं. 


मनसेला दोन जागा मिळण्याची शक्यता


दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये मनसेला दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे या निवडणुकीतून अमित ठाकरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामागे भाजपाचा आग्रह कारणीभूत ठरु शकतो. 


दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह आहे. राज ठाकरे यांनी मात्र या मागणीवर काय प्रतिक्रिया दिली आहे हे समजू शकलेलं नाही. पण तसं झाल्यास अमित ठाकरे निवडणूक लढताना दिसतील. दरम्यान शिर्डीमधून मनसेचे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतील.