LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून, पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. आपण पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे राजीनामा सोपवला असून, त्यांनी उगाच एक कागद वाया घालवला असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याही नावाचा समावेश आहे. काँग्रेस पक्ष वैचारिकरित्या अस्थिर झाला असून, दिशा भरटकला आहे असंही ते म्हणाले आहेत. तसंच नवरात्रीनंतर आपण निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"उद्धव ठाकरेंची शिवसेना आता उरलेली शिवसेना आहे. दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीत गेले आणि भाजपाला भ्रष्ट जनता पार्टी म्हटलं. जर ते असा विचार करत असतील तर मग एका भ्रष्टाचाऱ्याला आमच्या मतदारसंघात तिकीट का दिलं? माझ्या मतदारसंघात खिचडी चोराला उमेदवारी दिली आहे," अशी टीका संजय निरुपम यांनी केली. उद्धव ठाकरे गटाने मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. ईडीने कोविडमधील खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना समन्स दिलं आहे. 


"काँग्रेस पक्ष आता विखुरला आहे. ते वैचारिकरित्या भरकटले आहेत. आधी काँग्रेसमध्ये एकच पॉवर सेंटर होतं. इतर सर्वजण दरबारी होते. पण आता पाच पॉवर सेंटर बनवले आहेत. ते आपापसात भिडत आहेत. यामुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्रास होत आहे," अशी टीका संजय निरुपम यांनी केली. 


पुढे ते म्हणाले की, "⁠आज काँग्रेसमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जून खरगे आणि वेणुगोपाल पॉवर सेंटर झाले आहेत. हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम बोलले तरी समजत नाही असे लोक त्या ठिकाणी बसले आहेत. कालच मी रात्री 10 नंतर राजीनामा दिला आहे. त्यातील काही शब्द बघून त्यांना वाटलं असेल आपणही काहीतरी बोललं पाहिजे. यामुळे त्यांनी पत्र काढलं. त्यानी एक कागद वाया घालवला".



काँग्रेस आधी गांधीजींच्या सेक्युलर विचारांवर चालायची, पण आता नेहरूंच्या सेक्युलॅरिज्म नुसार चालत आहेत. काँग्रेसमध्ये काहीजण स्क्रॅप मटेरियल आहेत. त्यांच्यात माझं म्हणणे ऐकण्यासाठी कोण नाही असंही ते म्हणाले. 



"खरं बोलणे गुन्हा असेल तर मान्य आहे. खिचडी चोर म्हटल्यावर शिल्लक सेनेच्या लोकांनी दिल्लीत दबाव टाकला की निरुपम यांना काढा. मला काही लोकांचे फ़ोन येत आहेत की, काही महिने थांबा काँग्रेस पार्टीचं भविष्य आहे. पण मी सांगतो पक्षाचे काही भविष्य नाही. आता माझ्या विरोधात पक्षात बोलणारे आहेत ते कधी दुसऱ्या पक्षात जातील हे सुद्धा समजणार  नाही," असा टोलाही त्यांनी लगावला. 


शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षाचे हाल आपल्याला माहित आहेत. या तीन नुकसानीत गेलेल्या कंपन्या आहेत. त्यामुळे त्यांचं नुकसानच होणार असा टोलाही त्यांनी लगावला.