LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी एकमेकांना कडवी स्पर्धा देण्याच्या तयारीत असणारे सत्ताधारी आणि विरोधक आता आपापसात भिडताना दिसत आहेत. ठाकरे गटाने आधी सांगलीचा आणि आता मुंबईतील उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते उघडपणे नाराजी जाहीर करत आहेत. संजय निरुपम यांनी तर अमोल कीर्तिकर यांना 'खिचडी चोर' म्हणत त्यांचा प्रचार करणार नसल्याचं सांगितलं आहे. यानंतर आता संजय निरुपम यांनीही त्यांना उत्तर दिलं आहे. तुम्ही पाठिंबा दिलेले अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन जेलमध्ये आहेत अशी आठवण त्यांनी करुन दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"उद्धव ठाकरेंनी सांगलीत उमेदवारी जाहीर केली. रामटेकची जागा आमचीच होती. ती आम्ही काँग्रेसला दिली. तिथे काल अर्ज भरला. त्याबद्ल्यात आम्ही ईशान्य-मुंबई लढू असं ठरलं होतं. काही मतभेद आहे असं वाटत नाही. कार्यकर्त्यांचा 48 जागा लढू असा आग्रह असतो. कोल्हापूरला आमच्या लोकांचा आग्रह आहे. उद्धव ठाकरेंनी तिथे छत्रपती शाहू महाराजांची भेट घेत पाठिंबा दिला. अमरावती, रामटेक या आमच्या जागा आहेत, आम्ही काय खळबळ करत आहोत का? जे ठरलं ते ठरलं आहे," अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. 


'खिचडी चोरासाठी आम्ही...' उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करताच काँग्रेस नेता संतापला, 'आमचा पक्ष खड्ड्यात...'


 


संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अमोल किर्तीकर यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे आघाडीच्या धर्माचं उल्लंघन असल्याची टीका करताना संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांना 'खिचडी चोर' म्हटलं आहे. "शिवसेनेने खिचडी चोराला तिकीट दिलं आहे. आम्ही खिचडी चोरासाठी काम करणार नाही," असा निर्धारच संजय निरुपम यांनी केला आहे. 


संजय निरुपम यांच्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, "अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेने तुरुंगात आहेत. ईडीने खोट्या कारवाया केल्या आहेत. काँग्रेसने त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे". संभाजीनगरला चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली असून ती कायम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


दरम्यान शिंदे गटाने नाराज अंबादास दानवे यांना ऑफर दिली आहे. त्यांनी मागणी केली तर निश्चित विचार केला जाईल असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, "कोणाकडे काही ऑफर असेल आणि जाहीरपणे ऑफर आहे सांगत असतील तर विचार करावा. पण दानवे क़डवट, निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ऑफर असताना मी ओरडून सांगत नाही. मुळात आम्हाला ऑफर देण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आमचे पाय घट्टपणे शिवसेनेच्या मातीत रोवलेले आहेत". 


संजय राऊत यांनी आपण आजही वंचितसह युती करण्यासाठी आग्रही आहोत असं स्पष्ट केलं. पण प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या जागांवरही उमेदवार जाहीर केले आहेत. त्यावर बोलताना लोकशाही असून ते त्यांच्या पद्धतीने भूमिका घेत असतील असं म्हटलं. तसंच वंचितची आणि शिवसेनेची सर्वात आधी युती झाली. नंतर महाविकास आघाडीशी संबंध आला असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


"शेवटपर्यंत आशेची किरणं दिसत आहेत. प्रकाश आंबेडकरांना हुकूमशाहीविरोधात लढायचं आहे. त्यांच्या आजोबांनी समतेचा, संविधानाच विचार देशाला दिला आहे. तो त्यांनाच पुढे न्यायचा आहे. आम्ही त्यांच्या बाजूनेच आहोत. आम्ही त्यांना 5 जागांचा प्रस्ताव दिला होता. अद्यापही तो प्रस्ताव कायम आहे. चर्चा अद्याप संपलेली नाही," असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.