LokSabha: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर फैरी झाडत आहेत. पक्षांच्या राजकीय सभांना सुरुवात झाली असून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. नुकतंच मुरुडमध्ये शेकापचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात जयंत पाटील यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको असल्याचं विधान त्यांनी केलं. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी रायगडमधून सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. सुनील तटकरे अजित पवार गटाकडून जाहीर झालेले पहिले उमेदवार आहेत. अद्याप जागावाटप अंतिम झालेलं नसताना अजित पवारांनी सुनील तटकरेंचं नाव जाहीर केलं आहे. 


 


शेकापचे जयंत पाटील यांनी सभेत सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. "सुनील तटकरे यांना त्यांचे बंधू अनिल तटकरे यांनी मोठे केलं. पण सुनील तटकरे यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. आता आपल्याला सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीला उभे राहणार नाहीत अशी स्थिती करायची आहे. अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे," असा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 


जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांची पर्वा न करता शेकापचा लाल बावटा घेऊन सर्वांनी वेगळ्या उमेदीने कामाला लागा असं आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. तसंच शेकाप कधीही संपणार नाही असा इशाराही दिला. दरम्यान यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा उल्लेख अजित पवारांची दुसरी पत्नी असा केला. सुनील तटकरे म्हणजे अजित दादांची दुसरी बायको असं ते म्हणाले. 


शेतकरी कामगार पक्ष दिलेला शब्द पाळतो. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये अनेकांवर विश्वास ठेवून त्यांना शेतकरी कामगार पक्षाने जिंकून आणले आहे. त्याच पक्षाला संपविण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने केला जात आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला. 


शेतकरी कामगार पक्ष संघर्षातून निर्माण झाला असून एकनिष्ठ व स्वाभीमानी आहे. ही पक्ष गरीबांची बांधिलकी असणारा आहे याची जाणीव विरोधकांनी ठेवली पाहिजे. शेतकरी कामगार पक्ष कधीही न संपणारा पक्ष आहे असं जयंत पाटील म्हणाले आहेत.