LokSabha: सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणं आता जवळपास निश्चित झालं आहे. आता फक्त याची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. उदयनराजे भोसले दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन साताऱ्यात परतले आहेत. यावेळी जिल्हा प्रवेश सीमेवर शिरवळ-निरा नदीजवळ समर्थकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी सूचक विधान करत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी तसा शब्द दिल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या गळ्यात यावेळी भाजपाचं कमळ चिन्ह असणारं उपरणं घातलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातार लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तिढा निर्माण झाला होता. अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला होता. पण उदयनराजे यांच्या विधानामुळे राष्ट्रवादीने माघार घेतली असावी अशी चर्चा आहे. यादरम्यान सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचीही चर्चा आहे. 


"कालही मी जनतेचा होतो, आजही आहे आणि भविष्यातही लोकांच्या हिताचे निर्णय घेणार आहे. मला या भव्य स्वागतामधून कोणालाही इशारा द्यायचा नाही. सगळं निश्चित झालं आहे. निवडणूक मी लढणारच आहे. साताऱ्यात कधीतरी यायचं होतं. आज मुहूर्त मिळाला आणि पोहोचलो. समर्थकांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत," असं उदयनराजेंनी सांगितलं. 


"याआधीही माझे दिल्ली दौरे सुरु होते. मधल्या काळात दिल्लीला जावं लागलं. मला ताटकळत ठेवलं नाही. ती सर्व चुकीची माहिती होती. आज फक्त महाराष्ट्र नाही तर देशभरात निवडणुका आहेत. पहिल्या टप्यात उमेदवार जाहीर झाल्यानंतर जो तिढा निर्माण झाला होता ते आता सोडवले आहेत. यात कोणतीही शंका नाही. पक्षश्रेष्ठींनी मला जे काही सांगायचं आहे ते सांगितलं आहे. तसंच अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजपातील सहकारी, घटक पक्ष यांच्यासोबत बोलणं झालं असून शंका घेण्याची गरज नाही," असाही दावा उदयनराजे भोसले यांनी केला आहे.