मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. अहमदनगरमधून सुजय पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नगर, नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात विखे पाटील घराण्यांचे प्रस्थ आहे. त्यामुळे भाजपा सुजय यांना तिकिट देईल असे सांगण्यात येत आहे. ही घटना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असली तरीही विधानसभेत भाजपाला याचा मोठा फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुजय विखेंचे नाव भाजपातर्फे खासदराकीसाठी संसदीय समितीसाठी पाठवणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. आज देश कोणाच्या हाती सुरक्षित असेल तर तो मोदींच्या हातात आहे असे आजच्या तरुणांना वाटते.  म्हणून सुजय विखेंनी भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता नगर जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्लाच होणार आहे याच शंका नाही असेही ते म्हणाले.  नगर जिल्हातील जागा रेकॉर्ड मताने आपण निवडून आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 


अनेक दिवसांपासून हा विचार मनामध्ये येत होता. त्यानंतर आमच्या युवकांमध्ये हा निर्णय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य पाहता आम्ही सर्व तरुणांनी मिळून त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याचे मान्य केल्याचे सुजय विखे यांनी म्हटले आहे. भाजपाने आम्हाला सन्मानाने प्रवेश दिल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी मला मान सन्मान दिला. माझ्या वाईटाच्या काळात त्यांनी मला साथ दिली असे सुजय यावेळी म्हणाले. माझ्या वडीलांच्या इच्छेविरोधात जाऊन मला हा निर्णय घ्यावा लागला. भाजपात येण्याची ही भूमिका ही सुजय विखे पाटील याची वैयक्तिक भूमिका आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 



 काल एक धक्का माढामध्ये बसला आणि आज नगरमध्ये बसला. असे आम्ही एकामागोमाग एक धक्के आम्ही विरोधकांना देऊ असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. राज्यातली हवा कोणत्या बाजूने वाहते याचा अंदाज विखे घराण्यानेही घेतल्याचेही ते म्हणाले. येणाऱ्या निवडणूकीतही भाजपा नंबर एकचा पक्ष असेल असेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्यांचा मुलगा आम्ही आणू शकतो तर आम्ही काहीही करू शकतो हे भाजपाने दाखवून दिले आहे. सुजय यांचा भाजपा प्रवेश हे निमित्त आहेत पुढच्या काळात यापेक्षाही मोठ्या घटना घडणार असल्याचे भाजपातून सांगण्यात येत आहे. भाजपा पेक्षा आता पर्याय राहिला नाही हे सर्वांना समजून चुकलंय अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी झी 24 तासला दिली. 


 राधाकृष्ण विखे पाटील आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुलगा सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश टाळता येत नसल्यानं विखे पाटलांसमोर अडचण निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच नैतिकतेचा प्रश्न म्हणून पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत नगरची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून विखेंनी प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादीने जागा न सोडण्याची भूमिका कायम ठेवली आहे.