Republic Day 2023 : लोकशाहीवर बिनधास्त भाषण देऊन सगळ्यांना हसवणाऱ्या लहान मुलाची खरी कहाणी डोळ्यात पाणी आणणारी
प्रजासत्तान दिनी (Republic Day 2023) लहान मुलाने केलेल्या भाषणाने राज्यात धुराळा उडवला आहे. लहानपणीच दृष्टी कमी, परिस्थिती बिकट आहे. लोकशाहीचा भन्नाट अर्थ सांगणारा चिमुकला आहे तरी कोण?
नितेश महाजन, झी मीडिया, जालना : देशभरात गुरुवारी 74वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023 ) मोठ्या जल्लोषात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेच्या कार्यक्रमात 'लोकशाही' (Lokshahi Speech by School Boy ) या विषयावर भाषण देणारा लहान मुलगा हिरो बनला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेलं चिमुकल्याचे भाषण ऐकून सगळेच जण त्याचे फॅन बनले आहे. त्याच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर हा मुलगा नेमका आहे तरी कोण, तो राहतो कुठे असे प्रश्न सगळ्यांनाचा पडले आहे. मात्र, लोकशाहीवर बिधास्त भाषण देऊन सगळ्यांना हसवणाऱ्या लहान मुलाची खरी कहाणी डोळ्यात पाणी आणणारी अशी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ''लोकशाही'' विषयावर भाषण ठोकणारा त्या लहान मुलाचा अखेर शोध लागला आहे. कार्तिक जालिंदर वजीर असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील रेवलगावच्या जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात कार्तिक शिकत आहे. कार्तिक खूपच गोरा असल्यानं त्याला त्याचे मित्र आणि सगळी मुलं भूऱ्या म्हणून चिडवतात.
कार्तिकचे वडील शेतकरी असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. केवळ भाषणात त्याने सांगितल्याप्रमाणेच नाही तर मुळातच कार्तिक खूपच खोडकर आहे. व्हायरल झालेल्या भाषणाच्या व्हिडीओतून कार्तिकने सर्वांना आपलंसं केले आहे. मात्र, त्याच्या या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप मोठा संघर्ष दडलेला आहे.
कार्तिक हा रातअंधळेपणाच्या आजारानं त्रस्त आहे. त्यामुळे त्याचे शिक्षक त्याला थेट फळया समोर बसवतात. प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेत भाग घेतला. मग मलाही भाषणासाठी विषय द्या, असा हट्ट कार्तिकने शिक्षकांकडे धरला. शिक्षकांनी त्याला भाषणासाठी लोकशाही हा विषय दिला आणि त्याची तयारीही करून घेण्यात आली.
त्यानंतर मग कार्तिकनं लोकशाही विषयावर भाषण ठोकत अवघ्या राज्यभरात धुरळा उडवून दिला. दरम्यान कार्तिकच्या या व्हायरल व्हिडिओवर मुलाचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी आणि शिक्षकांनी दिली आहे. कार्तिकहा अभ्यासत खूपच हुशार आहे. त्याला खेळाचीही आवड आहे. त्याच्या रातअंधळेपणाच्या आजारावर उपचार झाले पाहिजेत असे त्याच्या शिक्षकांनी म्हटले आहे.
कार्तिकने लोकशाही विषयावर भाषण ठोकत अवघ्या राज्यभरात धुरळा उडवून दिला
"खरं तर आज लोकशाही दिन आहे. या दिवसापासून देशात लोकशाही सुरु झाली. मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करु शकता. भांडू शकता, दोस्ती करु शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझं नाव सरांना सांगतात. लोकशाहीची मूल्ये आतंकवादी जसे पायदळी तुडवतात तसे सर मला कधी कधी पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा बनवतात आणि म्हणतात तुझं वागणं लोकशाहीला धरुन नाही. तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तालुक्यात शोधून सापडणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जय लोकशाही," असे या चिमुकल्याने आपल्या भाषणात म्हटले आहे.