मुंबई : जातीचा नसेल, पण मातीचा आहे. प्रश्न भावाच्या भविष्याचा आहे. या टॅगलाईनखाली ठाण्यातल्या राबोडीतल्या मदरसा आणि मस्जिद सिद्दीकी ए अकबरमध्ये, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी खेड्यापाड्यातून आलेल्या उमेदवारांची आंघोळीची, तसंच राहण्या-जेवण्याची कोणतीही सोय पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे साकेत रोडजवळच्या पदपथावरच हे उमेदवार रात्री झोपत होते. 


राहणं, जेवणं तसंच आंघोळीची व्यवस्था


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरूणांचे हाल पाहून अखेर राबोडी भागातील क्रांतीनगरमधल्या मदससा आणि मस्जिद सिद्दीक ए अकबर मदरसाचं व्यवस्थापकीय मंडळ पुढे आलं. आणि त्यांनी या तरूणांची राहणं, जेवणं तसंच आंघोळीची व्यवस्थाही मदरशात केली. या उमेदवारांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये याकरता, पंख्यापासून कुलरपर्यंतची सोयही इथे पुरवण्यात आली. 


साहित्य गहाळ होऊ नये म्हणून पहारा


एवढ्यावरच न थांबता या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी वेळेवर पोहोचता यावं यासाठी, पहाटे 4 वाजता त्यांना उठवण्याचं कामही मदरसातले तरूण करताहेत. तसंच रात्री या तरुणांचे मोबाईल किंवा आणलेलं साहित्य गहाळ होऊ नये याकरता, मशिदीकडून पहाराही दिला जात आहे. 


मदरसा आणि मस्जिद सिद्दीकी ए अकबरतर्फे पुरवण्यात येत असलेल्या, या सर्व सुविधा तसंच आपुलकीबाबत, या उमेदवारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मदरशाच्या या माणुसकीच्या व्यवहारानं हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्शच घालून दिला आहे.