मुंबई : चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाच्या माघ महिन्यातील जयंती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्रीगणेशजयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. राज्यभर मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईतील प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्येही मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.  


हरकूळ खुर्द गाव बाप्पाच्या स्वागतासाठी सजले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकूळ खुर्द या गावातील श्री शृंगेश्वर विनायक मंदिरात माघी गणेशोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावात चाळीस वर्षांपुर्वी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. मात्र यंदा श्री शृंगेश्वर गणेशाचे अत्यंत सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. गुरुवारी या मंदिराचा कलशारोहण सोहळा पार पडला. यानिमित्त पुढील तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कलश मिरवणूक, कलश रोहणाचा कार्यक्रम करण्यात आला, त्यानंतर मोठ्या उत्साहात गुरुवारपासूनच माघी गणेशोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. 


दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी


गणेश जंयती निमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय. पहाटे चार ते सहा यावेळेत प्रसिद्ध गायिका मधुरा दातार यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शास्त्रीय गायनासह भक्तीगीते सादर केली. या कार्यक्रमानंतर गणेश याग, गणेश जन्म सोहळा आणि त्यानंतर बाप्पाची मंगल आरती करण्यात आली.