मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ६४ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तारिकगार्डन ही पाच मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा बळी गेला होता. या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना तसेच वारसांना ६४ लाख रुपयांचा इतका निधी मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. हा निधी वितरीत करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांना देण्यात आला आहे. मदतीची रक्कम मृत व्यक्तींच्या वारसांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाड तालुक्यातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत २४ ऑगस्ट २०२० रोजी पूर्णपणे ढासळून असून मोठी दुर्घटना घडली होती. याप्रकरणी तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डर आणि इतर दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बिल्डरला अटकही करण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल  करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याचप्रमाणे जखमींना योग्य ती शासकीय मदत देण्यात येईल, यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केल्याचे तसेच दुर्घटनाग्रस्तांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते.


या इमारत दुर्घटनेप्रकरणी मुख्‍य आरोपी फारूक काझी हा अखेर  न्‍यायालयाला शरण आला. न्‍यायालयाने त्‍याला पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले. ही दुर्घटना घडल्‍यापासून फारूक हा फरार होता. रायगड पोलिसांच्‍या तीन तुकडया त्‍याचा शोध घेत होत्‍या. दरम्‍यानच्‍या काळात अटकपूर्व जामिनासाठी त्‍याची धडपड सुरू होती. त्‍याने माणगाव सत्र न्‍यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. या गुन्‍हयातील सहा पैकी आरसीसी सल्‍लागार बाहुबली धामणे आणि फारूकचा सहकारी युनूस शेख या दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. 


कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही २५ पेक्षा जास्त लोक अडकले होते. एनडीआरएफची पथके श्वानपथकाच्या मदतीने युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य करण्यात आले. यावेळी एका चिमुकल्याला जिवंत बाहेर काढण्यात आले होते.