परळी: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात जोरदार राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपकडून मिळालेल्या वागणुकीची सव्याज परतफेड केली. त्यांनी व्यासपीठावर बसलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलेच टोले लगावले. यावेळी जानकर यांनी म्हटले की, आम्ही भाजपचा घटकपक्ष आहोत. तुम्ही आम्हाला कितीही त्रास दिलात तरी आम्ही तुमच्यासोबत राहू. मात्र, तुमच्याकडून त्रास देण्यात आला ही बाब मान्य करावीच लागेल. आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपशी जोडले गेलो. भाजपला पुन्हा सत्तेत आणायचे झाले तर आम्हीच आणू, असे जानकर यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मात्र, जानकर यांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना पक्ष न सोडून जाण्याची विनंतीही केली. आपण बारामतीची पालखी वाहून मोठे होणार नाही. आपल्याला न्याय हा भाजपमध्येच मिळेल. त्यामुळे यांनी आपल्याला मारले किंवा शिव्या दिल्या तरी आपल्याला यांच्यासोबतच राहावे लागेल. मात्र, भाजपने आगामी काळात घटकपक्षांना अशी वागणूक देऊ नये, असे महादेव जानकर यांनी सांगितले. 


तसेच राजकारणात हारजीत होतच असते. मात्र, लोकांनी आपल्या नेत्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायचे असते. आपण चार बोटं दुसऱ्याकडे करतो तेव्हा एक बोट आपल्याकडे येतं, हे परळीकरांनी विसरता कामा नये.  आपण खऱ्या अर्थाने पंकजाताईंच्या पाठिशी उभे राहिलो असतो तर आज हा दिवस पाहायला लागला नसता, अशी खंतही यावेळी जानकर यांनी व्यक्त केली.