विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : भगवानगडाच्या 89व्या नारळी सप्ताहात पंकजा मुंडे (Pankaja Munde), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि नामदेव शास्त्री (Namdev Shastri) एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. यावेळी पंकजा मुंडे आणि नामदेवशास्त्री यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगली. अनेक वर्षात पहिल्यांदाच हे तिघे एका मंचावर दिसले. पंकजांनी अहंकार कमी करावा असा टोला नामदेवशास्त्रींनी लगावला. तर उंचपुऱ्या व्यक्तिमत्वाला अहंकार समजू नका असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे धनंजय मुंडे एकत्र येणार?
संत भगवानबाबा (Sant Bhagwanbaba) यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन झालेलं पाहायला मिळालं. यामुळें बहीण भावातील संघर्षाची दरी कमी झाल्याची व्यासपीठवरुन दोघांनी घोषणा केली. सत्ता संघर्षावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मुंडे बहिण भावाचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र याच संघर्षाला भगवान गडाच्या पायथ्याशी भारजवाडी गावात नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पूर्णविराम झाल्याची कबुली दोघा बहिण भावाने दिली.


याप्रसंगी पंकजा मुंडे यांनी बोलताना माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे असं म्हणून या संघर्षाला पूर्णविराम देण्याची सुरुवात केली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून सादही दिली. धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झालं दोघेही आम्ही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा पण शक्ती सारखीच असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.


दोघं एकाच पाठीवरती जन्माला आलो आमचे भविष्य काही वेगळा असेल. त्या साठी काही वेळ वाट पहा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी बहिण भावाच्या एकत्रिकरणाचा नवा संकेत दिला आहे. तर धनंजय मुंडे यांनी आमच्या बहिण भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर या नारळी सप्ताहात कमी झालं अशी कबुली दिली.


आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचाराने काम करतो. विचार भलेही वेगळे असले तरी चालेल पण घरातल्या संवादामध्ये तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणाले.  मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्ती संदर्भात कोणीही संशय घेण्याचं कारण नाहीं. असं म्हणत गडाच्या वादावर ती पूर्णविराम दिला.


धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असताना सभेमधून एका व्यक्तीने तुम्ही दोघजण आणि एकत्रित यावं असे विनंती केली.. उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी जे होतं ते बऱ्यासाठी होतं असं म्हणताना पंकजाताई दोन वेळेस आमदार राहिल्या त्या मंत्री झाल्या त्याच पद्धतीने मी आमदार झालो विरोधी पक्ष नेता झालो आणि मंत्रीही झालो जर अस झालं नसतं तर दोघांपैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता असं तुम्ही समजून घ्या म्हणत धनंजय मुंडे यांनी आम्ही दोघे एकच आहोत असे संकेत दिले.