खेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा
कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय
ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने राज्यातील शेतकऱ्याला (Farmer) रडवलं आहे. आणि आता तर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. वांगी असो, कापूस असो नाहीतर कांदा. शेतकऱ्यांचा मालच विकला जात नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. तीन-चार महिने शेतात काबाडकष्ट करायचा. पण बाजारात शेतमालाच्या काढणीचा खर्चही निघत नाहीए. शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं, अशी चिंता त्याला लागलीय.
मन सून्न करणारी कहाणी
शेतकऱ्यांच्या हालाखिच्या परिस्थितीची मन सून्न करणारी एक कहाणी महाराष्ट्रातल्या धाराशिवमध्ये (Dharashiv) समोर आली आहे. नवीन कपडे घेण्याचा हट्ट एका चिमुरडीने आपल्या वडिलांकडे धरला. पण आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यात शेतकरी बाप हतबल होता. बाजारात कांद्याला भाव नाही, त्यातच कांदा काढण्यासाठी मजूराला द्यायला पैसे नाहीत. शेवटी ती चिमुकली आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी तळपत्या उन्हात कांदा काढणीच्या कामाला लागली.
तिसरी शिकणारी धनश्री चर्चेत
तुळजापूर (Tuljapur) तालुक्यातील अपसिंगा गावामधील धनश्री कोल्हे ही तिसरीत शिकणारी चिमुकली चांगली चर्चेत आली आहे. धनश्रीने आपल्या वडिलांकडे नवीन कपड्यांचा हट्ट धरला. तिच्या शेतकरी पित्याकडे धनश्रीला कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते, मजूर लावून शेतातील कांदा (Onion) काढणं परवडत नाही ,म्हणून तू शेतात कांदा काढायला चल. तुला नवीन कपडे घेतो असं धनश्रीच्या वडिलांनी तिला सांगितलं. नवीन कपड्यासाठी धनश्री सध्या या तळपत्या उन्हात वडिलांबरोबर शेतात कांदा काढते आहे. कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या लेकरांचे काय हाल झाले आहे याची कहाणी सांगणारे हे विदारण चित्र आहे
कांद्याच्या दरात घसरण
राज्यभरात सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महिनाभरापासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे. कांद्याच्या दरात कधी वाढ होणार याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी घाऊक बाजारात किलोमागे पाच ते आठ रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे .मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज कांद्याच्या 100 गाड्या दाखल होत असून, आवक वाढल्याने भाव गडगडले आहेत. एपीएमसी मार्केट मद्ये कांदा सात ते बारा रुपये किलो विकला जात आहे.