राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी? रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने
Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा रंगलीय. यातच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली असून अदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने आले आहेत.
Maharashtra Political News Today: एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा (CM Eknath Shinde) राजीनामा देणार नाहीत... कुणीही दिवास्वप्नं पाहू नयेत, असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंतांनी (Uday Samant) केलंय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेची महत्त्वाची बैठक झाली, या बैठकीनंतर त्यांनी हा दावा केला. राष्ट्रवादीच्या (NCP) सहभागामुळं शिवसेनेत (Shivsena) कुणीही नाराज नाही, असं सांगतानाच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होईल आणि शिंदेंच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीच्या समावेशामुळे नाराजी नसल्याचं काल रात्री उदय सामंतांनी म्हटलं होतं. शिंदे गटातील काही आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला होता. तसंच शिंदे गटाच्या बैठकीत दोन आमदारांमध्ये शिवीगाळही झाल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. इतकंच नाही तर शिंदे गटातील काही आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावाही विनायक राऊत यांनी केलाययाला उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे.
ज्या गोष्टी घडत नाहीत त्या तुमच्याकडे कशा पोहोचतात, कोणाच्यातरी सुपीक डोक्यातून आलं की दोन आमदारांमध्ये भांडण झालं पण अशी कोणतीही गोष्ट घडली नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राने अजून एक उठाव बघितला अजितदादांच्या रूपाने. काही लोक गद्दार खोके म्हणत होते त्यांना पूर्णविराम मिळाला. याशिवाय गेल्या अडीच वर्षात विकासकामे होत नव्हती हे देखील स्पष्ट झालं .एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना चालली आहे असंही उदय सामंत यांनी सांगितलं.
रायगडमध्ये वादाची ठिणगी?
दुसरीकडे, रायगडमधील पालकमंत्रिपदावरून वादाची पहिली ठिणगी पडलीय. आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना पालकमंत्री करण्यास जिल्ह्यातल्या शिवसेना-भाजपच्या सर्व आमदारांचा विरोध आहे. रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेसाठी राखीव असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी (Bharat Gogavale) केलाय. त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा तटकरे विरूद्ध गोगावले सामना रंगणारेय.
एका कुटुंबात तीन भाऊ
अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यावर सरकारमध्ये शिंदे गटाची नाराजी असल्याची चर्चा रंगलीय. मात्र यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एका कुटुंबात तीन भाऊ असतील तर कुरबुरू होऊ शकतात, मनभेद नाहीत अशी सारवासारव भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी व्यक्त केलीय. तर अजित पवार सर्वांना एकत्र घेऊन कारभार करतील असं भुजबळांनी म्हटलंय.
शरद पवारांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यावर आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणारेय. शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केलीय. त्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड दिल्लीत दाखल झालेत. देशातल्या विविध राज्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलंय. कार्यकारिणीतील 40 सदस्य उपस्थित राहणारेत. या बैठकीद्वारे पवार राष्ट्रवादीची देशपातळीवरील फळी सांभाळण्याची कसरत करणारेय. पक्षात फूट पडल्यानंतर आता कुणाचा समावेश करायचा याचाही निर्णय पवार घेणारेत. शरद पवार आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. राष्ट्रवादीचा लक्षद्वीपमध्ये एक खासदार आहे. तर नागालँडमध्ये 7 आमदार आणि झारखंडमध्ये एक आमदार आहे.