`म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही` छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं
Chhagan Bhujbal On CM Post: शरद पवारांनी आपल्या मुलाखतीतून 2004 साली छगन भुजबळ हे मुख्यमंत्री का झाले नाहीत? याचा किस्सा सांगितला होता.
Chhagan Bhujbal On CM Post: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला आठवडाभराचा कालावधी राहिलाय. असे असताना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रत्येक विधानाकडे विरोधकांचे बारकाईने लक्ष असते. पवार कधी काय बोलतील आणि कोणाची विकेट घेतील? हे सांगता येत नाही, हे विरोधकही मान्य करतात. दरम्यान शरद पवारांनी आपल्या मुलाखतीतून 2004 साली छगन भुजबळ हे मुख्यमंत्री का झाले नाहीत? याचा किस्सा सांगितला होता. यावर राज्यातील विविध राजकारण्यांनी प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान आता खुद्द छगन भुजबळ यांनीचा याचा खुलासा करत नेमकं काय घडलं होतं? याची माहिती दिली आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
2004 साली भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, पण असं नेमकं का करण्यात आलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं. 2004 मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं, एका एका वृत्तपत्राला मुलाखत देतेवेळी पवारांनी हा गौप्यस्फोट केला. '2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (तत्कालीन) राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे दिलं. तेव्हा ‘सिनिअर’ म्हणून माझ्यापुढे नाव होतं छगन भुजबळांचं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरूंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती', असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता.
'मला मुख्यमंत्री होऊ दिले नाही'
छगन भुजबळांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. सुधाकर नाईक आणि पवार साहेबांचे टोकाचे मतभेद झाले होते. कुणालाही मुख्यमंत्री केले की ते वरचढ होतात असे पवारांना वाटत होते. म्हणून अजित पवार असो की मी मला मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. झी टीव्हीवर हल्ला झाला म्हणून मला पदावरून हटविण्यात आलं होतं. यात माझा काही दोष नसतांना प्रफुल पटेल यांनी बोलावून घेतल. आणि मला राजीनामा देण्यास भाग पाडले.तुमची चौकशी होणार म्हणून तुम्ही मंत्री पदावर असणे योग्य नाही असे सांगण्यात आले. त्यानंतरच्या घटना मी नंतर संगिन, असेही भुजबळ म्हणाले. ज्यांची ज्यांची तक्रार होती त्यांची बदली करण्यात आली.संपूर्ण चौकशी झाल्यावर मला पूर्णपणे क्लिनचीट देण्यात आली. मला मुख्यमंत्रीपद द्यायचे नव्हते तर दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचे होते मात्र ते ही झाले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
'मला काँग्रेस मुख्यमंत्री करणार होते मात्र..'
बाळासाहेब माझी सतत लखोबा म्हणून टिंगल करत होते. म्हणून मी कायदेशीर लढा दिला मात्र नंतर मातोश्रीवर जाऊन मतभेद मिटविले.मात्र त्यावेळी तुम्हाला आनंद होत होता, असा टोला त्यांनी पवारांना लगावला. मला काँग्रेस मुख्यमंत्री करणार होते मात्र तुमच्या प्रेमापोटी मी गेलो नाही मग नंतर तुम्ही अध्यक्ष, उपमुख्यमंत्री केले असे ते म्हणाले. मी तुमच्या पक्षासाठी जीव हातावर घेऊन काम केले म्हणून तुम्ही हे सर्व दिले. मात्र ऊगीच गाढलेले मृतदेह उकरण्यात काय अर्थ? असा प्रश्न त्यांनी विचारला. शरद पवार यांच्याबद्दल मला आजही आदर आहे. मात्र तुम्ही बोललात म्हणून मला खुलासा करावा लागतोय असेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय म्हणाले रोहित पवार?
2004 साली छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असती असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. '2004 मध्ये अजित पवार, जयंत पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासारखे अनेक मोठे नेते पक्षांमध्ये होते. भुजबळांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असती आणि महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली असती असं पवार साहेबांना म्हणायचं असावं' असं रोहित यांनी स्पष्ट केलं.