Maharashtara Rain Updates : जुलै महिना सुरु झाला तोच मुळात पावसानं असं म्हणायला हरकत नाही. आता पंधरवडा उलटून गेला असला तरीही राज्यातून पाऊस उसंत घेताना दिसत नाहीये. उलटपक्षी पंधरवड्यानंतर तर पावसानं दुपटीनं जोर धरला असून, राज्याच्या अनेक जिल्ह्य़ांना झोडपून काढलं आहे. कोकणासह विदर्भामध्ये पावसाची दमदार हजेरी असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं मुंबईतही परिस्थिती वेगळी नाही. शहरात झालेल्या पावसामुळं वाहतुक विस्कळीत झाली असून, रेल्वे सेवांवरही याचे परिणाम दिसून येत आहेत. ज्यामुळं विद्यार्थी, चाकरमानी आणि रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकालाच प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रायगड, ठाणे, पालघर या भागांमध्येही परिस्थिती वेगळी नाही. एकंदर राज्यातून पाऊस सध्यातरी काढता पाय घेणार नाही असंच चित्र असल्यामुळं नागरिकांना वेळोवेळी सतर्क राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


येत्या 24 तासांतील हवामानाचा अंदाज सांगायचा झाल्यास पालघर,  ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गात रेड अलर्ट लागू करण्यात आल्यामुळं शुक्रवारी या भागांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील शाळाही आज बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान रात्रीपासून शहराच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतल्याचं निरीक्षणात आलं असलं तरीही काळ्या ढगांची चादर मात्र अद्यापही कायम असल्याचं स्पष्ट होत आहे. 


नांदेडमध्ये पूर


नांदेड जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झाला असून गेल्या 12 तासात जिल्ह्यात 230 मीलीमिटर पावसाची नोंद झालीये. मुखेड , बिलोली , धर्माबाद आणि देगलुर तालुक्यात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. मुखेड तालुक्यात काही गावात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. पाळा गावात पावसामुळे काही घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असुन ठीकठीकाणी प्रशासनाकडून मदतकार्य केलं जातं आहे. स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काही गावात जाऊन पाहणी केली. पूर आलेल्या तसचं पाणी साचलेल्या गावातील लोकांना सुरक्षीतस्थळी हलवल जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी दिली


 



हेसुद्धा वाचा : एक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना


पावसाचा जोर आणखी वाढणार... 


गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याची बाब लक्षात आली आहे. ज्यामुळं आता हा पाऊस नेमकी उसंत केव्हा घेणार? हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. पण, हवमानशास्त्र विभागानं मात्र वेगळंच चित्र समोर ठेवलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा 20 अंश उत्तरेला असून सामान्य परिस्थितीतीहून तो दक्षिणेकडे झुकला आहे. तिथं उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओरिसा किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्रही तयार झालं आहे. परिणामी हा पाऊस इतक्यात तरी पाठ सोडणार नाही हेच आता स्पष्ट होत आहे. 


पुढील दोन दिवस राज्यातील कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावरील परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपातील पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसानं जोर धरल्याचं पाहून अनेकजण पावसाळी सहलींसाठी माळशेज, पाचगणी, मळवली, लोणावळा, आंबोली, इगतपुरी या आणि अशा अनेक ठिकाणांवर जाताना दिसत आहेत. पण, अशा ठिकाणी जात असतानाच सतर्क राहा आणि भान हरपून देऊ नका असंच आवाहन यंत्रणा करताना दिसत आहेत.