मुंबई: कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू कमी होऊ लागल्यामुळे आता ठाकरे सरकार महाराष्ट्रात हळूहळू अनलॉक करत आहे. 5 टप्प्यांमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या आठवड्यात बदल करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग दर आणि रुग्णसंख्या घटल्यानं राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आजपासून शिथिल होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्य़ांतील सर्व निर्बंध रद्द झालेत. स्थानिक प्रशासनानं काही निर्बंध ठेवल्यास ते लागू असतील. अन्यथा या जिल्ह्य़ांमध्ये आता कुठलेही निर्बंध नसतील. 


पुणे शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकानं आजपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. पालघर जिल्ह्याचा दुसऱ्या स्तरात समावेश झाल्यानं त्याठिकाणीही बहुतांशी निर्बंध रद्द झाले आहेत. 


मुंबई शहराचा समावेश दुसऱ्या स्तरात झाल्यानं निर्बंध कमी होणं अपेक्षित होतं, पण गर्दी टाळण्यासाठी तसंच अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई शहराला तिसऱ्याच स्तरातच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई पूर्ण अनलॉक होण्यासाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे.  


परभणी जिल्हा आणि सोलापूर शहरातील निर्बंध आजपासून आणखी शिथिल होत आहेत. या दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानं पहिल्या स्तरानुसार निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे मॉल, रेस्तराँ, सिनेमागृह, नाट्यगृह नियमितपणे सुरू होतील. विवाह सोहळ्यासाठी 50 ऐवजी 100 लोकांना परवानगी असेल. तर अंत्यसंस्कार नियमितपणे पार पाडता येतील.