मुंबई : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. तुमची मुलं ज्या शाळेत शिकतायेत त्या शाळा बोगस तर नाहीत ना, हे जरा तपासून पाहा. कारण राज्यातील तब्बल 674 शाळा अनधिकृत झी 24 तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये आढळून आलं आहे. शिक्षण विभागानं या शाळांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र आता पालकांवर एक नवं संकट घोंगावू लागलंय. राज्यात तब्बल 674 शाळा अनधिकृत असल्याचं आढळून आलं आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक 223 शाळा मुंबईमध्ये आहेत. 


या शाळांवर शालेय शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणारंय. शिक्षण विभागानं एका पत्राद्वारे या बोगस शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शाळांनी यू डायस प्रमाणपत्र घेतलेलं नाही अशा शाळांची यादी शिक्षण विभागानं जाहीर केलीय. त्यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. 



कुठे किती बोगस शाळा 


मुंबईत अशा 223 शाळा अनधिकृत आहेत. ठाण्यात 149 तर पालघरमध्ये 143 शाळांनी यू डायस प्रमाणपत्र घेतलेलं नाही. पुण्यात 34 तर नागपुरात 31 शाळा अनधिकृत आहेत. नाशिकमधील 21 आणि औरंगाबादमधील 13 शाळांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. 


या बोगस शाळांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणारंय. याला जबादार कोण असा सवाल पालक संघटनांनी उपस्थित केलाय. तर आपल्याला असे कोणतेही आदेश मिळालेले नसून मान्यतेसाठी शासनदरबारी कागदपत्रं दिल्याचं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे. 


कशा ओळखाल अनधिकृत शाळा? 


संपूर्ण देशात कोणत्याही शासन मान्यताप्राप्त शाळेची यू-डायस नोंदणी असते. हा यू-डायस 11 अंकी असतो. पाच भागांमध्ये हा यु-डायस क्रमांक विभागलेला असतो. उदा. 27,36,35,540,83 हा 11 अंकी नंबर असल्यास सुरूवातीचे दोन अंक राज्य दर्शवतात. 


त्यानंतरचे दोन अंक जिल्हा, पुढचे दोन अंक तालुका आणि त्यानंतरचे तीन अंक गाव किंवा वॉर्ड दर्शवतात शेवटचे 2 अंक शाळा दर्शवतात. त्यामुळे पालकांनो सावध राहा, तुमची मुलं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा यू-डायसचा नंबर तपासून पाहा. कारण सवाल तुमच्या मुलांच्या भवितव्याचा आहे.