अमर काणे, झी मीडिया नागपूर: कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही, याची चर्चा सुरू असताना आता डेंग्यूच्या एका नव्या व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. या व्हेरियंटबाबत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. डेंग्यूचा नवा व्हेरिएंट जीवघेणा आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणं काय आहेत जाणून घेऊया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाची लाट काहीशी आटोक्यात येत असतानाच डेंग्यूचा धोका वाढत असल्याचं चित्र आहे. डेंग्यूचा DENV-2 हा नवा व्हेरियंट जास्त धोकादायक असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ, ओडिशासह 11 राज्यांमध्ये या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आलेत. एरवीही पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळतात. मात्र यावेळी प्रमाण जास्त असल्यामुळे चिंता वाढलीये.



काय आहेत डेंग्यूच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणं 


डेंग्यू व्हायरस साधारणतः चार रुपांमध्ये आढळून येतो. याला D1, D2, D3 आणि D4 अशी नावं आहेत. यातल्या DENV-2 किंवा स्ट्रेन D2 मध्ये कोविडसारखे काही गुणधर्म त्याला धोकादायक बनवतात. यामध्ये ताप येणं, प्रचंड डोकेदुखी, सांधेदुखी, पोटदुखी, जुलाब अशी लक्षणं आढळतात.  यातली बरीचशी लक्षणं ही कोविडमध्येही असल्यामुळे निदान करणं अवघड असतं. या व्हेरियंटवर लवकर उपचार केले नाहीत, तर तो जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. 


कोविडपेक्षा डेंग्यूमध्ये एक समाधानाची बाब म्हणजे तो श्वासाद्वारे पसरत नाही. मात्र डासांवर नियंत्रण ठेवलं नाही आणि योग्य काळजी घेतली नाही तर हा नवा व्हेरियंट थैमान घालण्याचा धोका आहे.