मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाच्या बैठका, चर्चा आणि भेटीगाठीचा असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस भाजपश्रेष्ठींना भेटणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सत्तास्थापनेमधल्या तिढ्यावर ते या भेटीत चर्चा करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस आणि अमित शहा भेट नेमकी कशासाठी? आज फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोंदींना देखील भेटणार का? यावरून सध्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील दिल्लीला पोहोचले आहेत. निकालानंतर ते देखील पहिल्यांदाच दिल्लीला आले आहेत. आज शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर आता दिल्लीतच तोडगा निघण्याची शक्यता आहे.



शिवसेना खासदार संजय राऊत आज राज्यपालांना भेटणार आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला आमंत्रण द्यावं असं निवेदन ते राज्यपालांना देणार आहेत. या निमित्ताने शिवसेना भाजपाची ताकद अनुभवणार आहे. जर भाजपानं बहुमत सिद्ध केलं नाही तर शिवसेना सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याची शक्यता आहे. या भेटीतून ते भाजपाची कोंडी करायचा प्रयत्न करणार आहेत.