नवनीत राणांच्या सभेत खुर्च्यांची तोडफोड, थोडक्यात बचावल्या; काय झालं नेमंक?
Navneet Rana Sabha Rada: या राड्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या असून खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.
Navneet Rana Sabha Rada: अमरावतीच्या खल्लारमध्ये नवनीत राणांच्या सभेत तुफान राडा पाहायला मिळाला. येथे संतप्त जमावाने खुर्च्यांची तोडफोड केली. यात राणा थोडक्यात बचावल्या. दोन समुदाय आपसात भिडल्याने तणाव निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर नवनीत राणा यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी नेमकं काय झालं? जाणून घेऊया.
दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ खल्लार येथे नवनीत राणा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत अचानक गोंधळ झाल्याने दोन समुदायातील कार्यकर्ते समारासमोर आल्याने माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत तुफान राडा झाला.
या राड्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या असून खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याने काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच नवनीत राणा यांच्या अंगावरही काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या फेकल्याचे पाहायला मिळाले.
काही काळ तणावाचे वातावरण
अचानक खुर्च्यांची फेकाफेकी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान नवनीत राणा खल्लार पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून तक्रार नोंदवण्यात आली आहे.
नवनीत राणांवर कारवाई होणार?
लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी नवनीत राणा भाजपच्या स्टार प्रचारक आहेत. पण भाजपच्या या स्टार प्रचारक चक्क बंडखोराचा प्रचार करताना दिसतायेत. अमरावतीच्या दर्यापूरमधील एका बंडखोर उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या मैदानात उतरल्यात. दर्यापूरमध्ये महायुतीचे कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्याविरोधात बंडखोरी केलेल्या रमेश बुंदिले यांचा प्रचार करतायेत.नवनीत राणांनी बुंदिलेंसाठी मतांचा जोगवा मागितलाच, शिवाय बुंदिलेंच्या व्यासपीठावरुन महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ आणि आनंदराव अडसुळांवर टीका केली. माजी आमदार रमेश बुंदिले यांनी भाजपसोबत बंडखोरी करत रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. राणा हे महायुतीत असताना देखील दर्यापूरमधून त्यांनी रमेश बुंदिलेंना रिंगणात उतरवलंय. रवी राणांच्या या कृतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापलेत. त्यांनी राणांना जाहीर तंबी दिलीय. "महायुती मजबूतीने लढत आहे. महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकण्यातं काम करु नका. मी राणा परिवारालाही सांगतो की, तुम्ही महायुतीचे घटक आहात. महायुतीत सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलं आहे. सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजीत अडसूळदेखील आपल्याला हवे आहेत. म्हणून आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीत राहायचं आणि महायुतीच्या विरोधात काम करायचं हे कोणी करता कामा नये. मुख्यमंत्री म्हणून मी हे आवाहन करत आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान नवनीत राणांची भाजपमधून तर रवी राणांची महायुतीतून हकालपट्टी करण्याची मागणी तुषार भारतीय यांनी केलीये. तर आम्हाला वेगळा आणि त्यांना वेगळा न्याय का?.. असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या नवनीत राणा या गळ्यात भाजपचा गमचा घालून महायुतीचा उमदेवार सोडून बंडखोर उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरल्यात. त्यामुळे महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या राणांवर काय कारवाई होते याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलंय.