वाघाच्या दहशतीमुळे `येथे` मतदार फिरकलेच नाहीत
लोकशाहीच्या उत्सवावर वाघोबांच्या दहशतीचं सावट
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र नागरिक मतदानासाठी बाहेर पडत असतानाच आगरगाव येथे मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. वर्धा येथील आर्वी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या आगरगावात एकाही मतदारानं मतदान केलेलं नाही.
मतदानाचा दिवस सुरु होऊन तब्बल आठ तासांहून अधिक काळ लोटूनही आगरगावात मतदानावरील हा बहिष्कार कायमच असल्याचं पाहायला मिळत आहे. मतदान न केलं जाण्याचं आणि या बहिष्काराचं धक्कादायक कारण म्हणजे या गावातील वाघाची दहशत.
काही दिवसांपूर्वी या गावात वाघिणीच्या हल्ल्यात भूमेश गाखरे या तरुणाचा मृत्यू झाला होता तेव्हापासूनच सुरु असणारा हा बहिष्कार सोमवारी, निवडणुकीचा दिवसापर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. मतदानाची वेळ संपण्यास अवघे काही क्षण उरलेले असले तरीही या गावातील एकाही नागरिकाने मतदान मात्र केलेलं नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात सकाळच्या सत्रानंतर मतदानाचा वेग वाढलेला दिसून येत आहे. मतदानाचा निरूत्साह कायम राहिल्यामुळे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राज्यात केवळ ३० टक्के मतदानाची नोंद झाली होती. यामध्ये कोल्हापुरात सर्वाधिक म्हणजे ३३ टक्के, तर मुंबईत केवळ २५ टक्के मतदान नोंदवलं गेलं. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या प्रसिद्धीमाध्यम कक्षातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजेपर्यंत ७,३९७ पैकी ६३९० मतदान केंद्रांची आकडेवारी हाती आली होती. या आकडेवारीनुसार २६.०६ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये ११,५५,४६२ पुरुष आणि ७,३७,१९५ व १२८ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यातील एकूण १८ लाख, ९२ हजार ७८५ मतदारांनी मतदान केलं आहे.