मुंबई : भारतीय जनता पार्टी एकटं सरकार कसं स्थापन करण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एकटं सरकार कसं स्थापन करतात तेच पाहू असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. स्वबळाच्या नाऱ्यावरून सध्या भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून आज भाजपा आणि मुख्यमंत्र्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे. सामना नेहमी सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला आहे त्याचे तटस्थ, परखड विश्लेषण सामनामध्ये आले असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना-भाजपाला जनादेश आहे पण तो महाजनादेश नाही. दोन्ही बाजूने चिंतन करण्याची गरज आम्ही मांडल आहे. शिवसेना भाजपामध्ये ज्या चर्चा झाल्या त्यासंदर्भात लिहिले आहे. लोकांनी आम्हाला धडा का शिकवला याबद्दल लिहिले असल्याचे राऊत म्हणाले. 



कोणालाही कमी समजू नका हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो. आपल्यासमोर कोणी पेहलवान नाहीच हा गैरसमजही नसावा हे देखील आम्ही याआधी स्पष्ट केले आहे. ज्याप्रकारचे पक्षांतराची लाट आली ती लोकांना आवडली नाही. शिवसेनेने याची सुरुवात केली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पक्षांतरे घडवली नाहीत. त्यांचे तेच कार्यकर्ते उभे राहिले आणि तेच जिंकले असेही राऊत म्हणाले. 


रामदास आठवलेंच्या पक्षाला २ जागा मिळाल्या. त्यांना दोन मंत्रीपदं हवी आहेत. महादेव जानकरही दोन मंत्रीपद मागतायत. यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. असे असताना मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आग्रही का असू नये ? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.  आमचे १८ खासदार आहे, आम्ही लोकसभेला अध्यक्ष दिलाय. सत्तेतला वाटा अर्धा अर्धा असावा हे ठरलंय तर आम्ही दावा का करु नये असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 


स्वबळावर ते सरकार स्थापन करत आणि १०५ आणि काही अपक्ष घेऊन स्थिर सरकार स्थापन करणार असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा असेही राऊत म्हणाले. 


मतदानानंतर राज्यातील राजकिय वातावरण तापले आहे. त्यामुळे पुढे जाऊन महायुतीचे सरकार येणार की भाजपा 'एकला चलो रे' मार्गावर जाणार हे येणाऱ्या काळात ठरणार आहे.