महाराष्ट्रातल्या 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज; ईव्हीएमवर उमेदवारांचा संशय
विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आलाय. महायुतीनं जोरदार मुसंडी मारत बहूमताचा आकडा गाठलाय. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम सुरु केलीये. राज्यातील काही मतदारसंघात ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी भाजप नेत्यांनी केलीये.
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम सुरु केलीय. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा पराभूत आमदारांना संशय आहे. ईव्हीएमवर संशय असणाऱ्या आमदारांमध्ये भाजप नेते राम शिंदे यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेत.
उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणी करता येते. एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी 47 हजार 200 रुपये शुल्क लागतं. कोर्टात कुणी आव्हान न दिल्यास अर्ज केल्याच्या 45 दिवसांत ही पडताळणी होते.
यामध्ये संगमनेरचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात, पुणे कॅन्टोनमेंटचे उमेदवार रमेश बागवे, कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे, नगर शहर अभिषेक कळमकर, पारनेरच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राणी लंके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राहुरीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, कोपरगावचे संदीप वरपे, विक्रमगडचे सुनील भुसारा, हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, शिरूरचे अशोक पवार, खडकवासल्याचे सचिन दोडके, चिंचवडचे राहुल कलाटे, तुमसरचे उमेदवार चरण वाघमारे, अणुशक्तीनगरचे फवाद अहमद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरी पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे, ठाणे शहरचे उमेदवार राजन विचारे, ओवळा माजिवड्याचे नरेश मणेरा, डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे, ऐरोलीचे एम. के. मडवी, बविआचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे उमेदवार क्षितीज ठाकूर बोईसरचे उमेदवार राजेश पाटील यांचा समावेश आहे.
ईव्हीएमबाबत सगळ्यांनाच शंका असल्यानं पडताळणी करत असल्याचा दावा पराभूत उमेदवार संदीप वरपे यांनी केलाय.पराभव पचवता आला नाही ते उमेदवार ईव्हीएमवर संशय घेत असल्याचा आरोप भाजपच्या शिवाजी कर्डिलेंनी केलाय.राम शिंदेंनी ईव्हीएम पडताळणीचा अर्ज करुन अमित शाहांवरच संशय घेतल्याचा टोला रोहित पवारांनी लगावलाय. ईव्हीएम मशीनच्या पडताळणीत पराभूत उमेदवारांची शंका दूर होते का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.