`आम्ही पुन्हा..`, `ही निवडणूक फार..`; MVA च्या पराभवानंतर आदित्य ठाकरेंची Insta स्टोरी
Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या 20 जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच 25 जागांहून खाली सरकली आहे.
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी फारच धक्कादायक ठरला आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळून केवळ 46 जागा जिंकता आल्या आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकूण 232 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीविरुद्धचा हा कौल सत्ताधाऱ्यांची लाट नसून त्सुनामी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र या त्सुनामीमध्येही महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी कडवी झुंज देत विजय मिळवला. या विजेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे. आदित्य ठाकरेंनी या विजयानंतर निवडणुकीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसमधून निवडणुकीवर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आदित्य ठाकरेंचा विजय
आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघातून 8 हजार 801 मतांनी विजय मिळवला आहे. आदित्य यांना एकूण 63 हजार 324 मतं मिळाली. या मतदारसंघातून त्यांच्यासमोर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद देवरांचं आव्हान होतं. मिलिंद देवरांना 54 हजार 523 तर मनसेच्या संदीप देशपांडेंना 19 हजार 367 मतं मिळाली. आदित्य ठाकरेंचा वरळीमधून हा सलग दुसरा विजय आहे.
विजयानंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे
महाविकास आघाडीला दारुण पराभवाला समोरं जावं लागल्याने आदित्य ठाकरेंनी आपल्या वैयक्तिक विजयानंतर प्रत्यक्ष प्रतिक्रिया नोंदवली नसली तरी त्यांनी इन्स्टाग्राम स्टेटसमधून या विजयावर भाष्य केलं आहे. "पाठिंबा दर्शवणारे आणि आशिर्वाद देणारे मेसेज पाठवणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. सर्वांना रिप्लाय करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना रिप्लाय करतोय. मात्र कोणाला रिप्लाय करायचा राहून गेलं असेल तर मी माफी मागतो," असं आदित्य ठाकरेंनी पहिल्या दोन पॅरांमध्ये म्हटलं आहे. पुढे त्यांनी, "नक्कीच ही निवडणूक अपेक्षापेक्षा फारच वेगळी ठरली. तुमच्याकडून मिळणारा असा पाठिंबा आणि आशिर्वाद खरोखरच प्रेरणादायी आहेत," असंही म्हटलं आहे.
पोस्टच्या शेवटी आदित्य ठाकरेंनी, "आम्ही पुन्हा येऊ पूर्वीपेक्षा आणखी शक्तीशाली होऊ. सर्वांसाठी पूर्वीपेक्षा अधिक उत्तम राज्य निर्माण करण्यासाठी आम्ही नक्कीच परत येऊ," असं म्हटलं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाने 20 जागा जिंकल्या आहेत. तर शरद पवार गटाला 10 आणि काँग्रेसला 16 जागांवर विजय मिळवला आहे.