विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?
नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
विधानसभा निवडणुकींची धामधूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा दिवस होता. यानंतर आता सगळ्या उमेदवारांचं लक्ष हे जाहीर सभा, प्रचार फेरी याकडे आहे. असं असताना सारखीच नावं असलेल्या उमेदवारांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम फक्त महायुती आणि मविआचा नाही तर सामान्यांचा देखील होणार आहे.
एकाच मतदारसंघातून कदम आडनावाचे एक, दोन नाही तर चक्क सहा उमेदवार आहेत. अशावेळी निवडणुकीत 'सेम टू सेम' अशा उमेदवारांमुळे गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. या बातमीत एकच आडनाव किंवा नाव असलेल्या उमेदवारांची यादी पाहणार आहोत.
दापोली मतदारसंघ
शिवसेनेच्या उद्धव गटाचे संजय कदम यांच्या नावात साधर्म्य असलेले दोन संजय कदम अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या योगेश रामदास कदम यांच्या नावाचे साधर्म्य असलेले दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. दापोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकाच नावाच्या व्यक्ती निवडणुकीत उभ्या केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा.
संजय वसंत कदम ( उध्दव गट)
संजय संभाजी कदम(अपक्ष)
संजय सिताराम कदम (अपक्ष)
योगेश रामदास कदम ( शिंदेंची शिवसेना)
योगेश रामदास कदम (अपक्ष)
योगेश विठ्ठल कदम (अपक्ष)
असे उमेदवार रिंगणात असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभेच्या जागेवर गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
सांगली मतदारसंघ
दापोलीप्रमाणे सांगली जिल्ह्यातही उमेदवारांची नावे आणि आडनावे एकसारखीच आहे. यामध्ये दिवंगत काँग्रेस नेते माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. सारख्याच नावाचे दोन उमेदवार विरोधात निवडणूक लढणार आहे.
तसेच तासगाव कवठेमहामंडळ मतदार संघात माजी गृहमंत्री दिवंगत नेते आर.आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटीले हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभेत उमेदवार आहेत. रोहित पाटील याच नावाने आणखी तिन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
पर्वती मतदारसंघ
पुण्याताली पर्वतीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अश्विनी नितीन कदम यांना उमदेवारी दिली आहे. जनता वसाहत येथील अश्विनी अनिल कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून बापूसाहेब पठारे उमेदवार आहेत. याच मतदार संघातून श्रीगोंदा येथील बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातच नाही तर राज्यातील इतर मतदार संघामध्ये असा प्रकार आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्याशी नाम साधर्म्य असलेले दुसरे वैभव नाईक रिंगणात उतरलेत. साधर्म्य असलेल्या उमेदवारांच्या नावांमुळे गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे.