मुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न ऐकताच फडणवीस म्हणाले, `याचं उत्तर...`
Devendra Fadnavis On Who Will Be Next CM: महायुतीला 230 हून अधिक जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील गूढ कायम असून याचबद्दल फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
Devendra Fadnavis On Who Will Be Next CM: राज्याच्या विधानसभेचा निकाल लागून चार दिवस उलटल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेलं नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना शिंदेंनाच मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी आग्रही असतानाच भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा जिंकल्याचं सांगत मुख्यमंत्री भाजपाचा होणार अशी भूमिका घेतली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितल्याचं दिसत आहे. असं असतानाच मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य दावेदार मानले जात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रिपदासंदर्भात भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीस म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांना, "मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात चर्चा सुरु आहे," असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी, "या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून लवकरच निर्णय घेतील. आमचे पक्ष श्रेष्ठी लवकरच याबद्दल निर्णय घेतील. याचं उत्तर लवकरच आपल्याला मिळेल," असं म्हटलं आहे. फडणवीसांना पुढील प्रश्न मंत्री कोण होणार यासंदर्भात विचारण्यात आला. "अनेकांची मंत्री होण्याची इच्छा आहे," असं म्हणत प्रश्न विचारला. या प्रश्नावर फडणवीसांनी हसतच, "आधी मुख्यमंत्री ठरेल. मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील. मला वाटतं मुख्यमंत्र्यांची वाट पहावी त्यानंतर मंत्र्यांची पण नावं लक्षात येतील," असं सांगितलं.
ईव्हीएमवरुन टोला
ईव्हीएमसंदर्भात महाविकास आघाडीमधील नेत्यांनी केलेली विधानं आणि त्याविरोधात केल्या जाणाऱ्या संभाव्य आंदोलनाबद्दलही फडणवीसांना विचारण्यात आलं. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी, "सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिलं आहे. तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत करा. ईव्हीएम टॅम्परप्रूफ आहे. ईव्हीएमची पद्धत सुरुच राहणार आहे. हा रडीचा डाव आता बंद करा," असा सल्ला मविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.
दिल्लीत ठरणार मंत्री कोण
राज्याच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असावं यावर दिल्लीत खलबत सुरु झाली आहेत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनेक नावांवर चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समतोल राखत मंत्रिपद दिली जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सगळ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळाल पाहिजे याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा भर असल्याचे समजते. मुख्यमंत्री यांच्यासोबत होणाऱ्या शपथविधी वेळी भाजपच्या 10 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्र्यांची अंतिम यादी दिल्लीत तयार होणार असल्याचेही समजते. मुख्यमंत्री ठरवण्याआधी महाराष्ट्रात दिल्लीतून दोन निरिक्षकही पाठवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.