राऊतांनी मांडला ₹2250000000 चा हिशोब! शिंदे, फडणवीस, पवारांचं नावं घेत सांगितलं नेमकी रोकड पोहोचली कुठे
Maharashtra Assembly Election Khed Shivapur Moeny: संजय राऊत यांनी सोमवारी रात्री खेड-शिवापूर टोलनाक्यावर एक नाही तर दोन गाड्या होत्या ज्यामध्ये रोख रक्कम होती असा दावा केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी थेट मोठ्या नेत्यांची नावं घेतली आहेत.
Maharashtra Assembly Election Khed Shivapur Moeny: पुण्यातील खेड-शिवापूर टोलानाक्यावर जप्त करण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांच्या रोख रक्कमेसंदर्भात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. ही रक्कम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाठवण्यात येत होती, असा आरोप राऊतांनी पत्रकारांशी बोलताना केला. टोलनाक्यावर 15 कोटी घेऊन दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक गाडी आमच्या लोकांनी पकडून दिली असली तरी 10 कोटी असलेली गाडी निश्चित स्थळी पोहचल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
थेट मुख्यमंत्री, फडणवीस आणि अजित पवारांचा उल्लेख
"पुण्यातील खेड-शिवापूर टोलानाक्यावर काल दोन गाड्या होत्या. त्यामध्ये एकूण 15 कोटी होते. मी 8 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंच्या आमदारांना आणि इतर काही लोकांना 50 कोटींपेक्षा अधिक रक्कम पोहचवण्याची तयारी झाली आहे. 15-15 कोटींची पहिली इन्स्टॉलमेंट पाठवली जात आहे. आचारसंहिता लागली त्या रात्रीच ही तयारी झाली. मोठी रक्कम अनेक ठिकाणी पोहचवण्यात आली. सांगोल्यातील गद्दार आमदाराचे 15 कोटी जात होते. त्याच आमदाराचे लोक गाडीमध्ये होते. एक फोन आला त्या गाड्या सोडल्या," असं संजय राऊत म्हणाले. "एक इन्पेक्टर त्या आमदाराने त्याच्या गावात सेवेसाठी ठेवला होता. तो तिथे पोहचला आणि त्याने एक गाडी सोडवली. पण आमच्या लोकांनी एका गाडी पकडून दिली. राज्यात 150 आमदार आहेत ज्यांना 15 कोटी पोहचले आहेत. हे एक उदाहरण आहे की मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडून कशाप्राकारे पैशांचं वाटप केलं जात आहे," असं राऊत म्हणाले. राऊत यांनी 150 आमदारांना प्रत्येकी 15 कोटी म्हणजेच 225 कोटींचं वाटप करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
10 कोटी रुपये झाडी, डोंगरात...
"उतरलेली रक्कम टप्प्याटप्प्यात आणि पोलीस बंदोबस्तात पोहचवायच्या असं नियोजन होतं. काल सांगोल्याकडे जाणारी रक्कम 'काय झाडं, काय डोंगर...' त्या डोंगरातून ही रक्कम जाणार होती. रक्कम होती 15 कोटी मी तुम्हाला सांगतो. 5 कोटी दाखवण्यात आले. 10 कोटी व्यवस्थित झाडी आणि डोंगरात पोहचवण्यात आले. जे पोलीस अधिकारी तिकडे होते. त्यांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन फोन आले. आमचे कार्यकर्ते तिथे जमले. त्यामुळे त्यांना 5 कोटी पकडल्याचं दाखवण्यात आलं. 10 कोटी रुपये झाडी, डोंगरात पोहचल्याची माझी पक्की माहिती आहे," असं संजय राऊत म्हणाले.
आम्हाला शहाणपणा शिकवता
"निवडणूक आयोग आम्हाला शहाणपणा शिकवतं. आचारसंहिता दाखवतं. निवडणूक आयोगाचे भाजपाचे लोक असे कोट्यावधीचे व्यवहार करत आहेत. मत विकत घेत आहेत. कशी होणार निवडणूक?" असा सवाल राऊत यांनी विचारला. तसेच पुढे बोलताना या प्रकरणामध्ये पोलिसांनाही मॅनेज केल्याची शक्यता राऊतांनी व्यक्त केली. "पोलिसांच्या तोंडात सुद्धा बोळा कोंबला असेल. 15 कोटींपैकी 10 कोटी गेले. त्यातला काही गोळा कोंबला असेल, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. आमच्याकडे हजार दोन हजार सापडले तरी आमच्यावर कारवाई करतात. पण पाच पाच कोटी, दहा दहा कोटी खातात त्यांच्याकडे निवडणूक आयोग कानाडोळा करत आहेत," असं राऊत म्हणाले.