Maharashtra Assembly Election 2024: माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या लातूरमधील ग्रामीण मतदारसंघातून त्यांचे धाकटे सुपूत्र धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे धाकटे बंधू तसेच अभिनेता रितेश देशमुख यांनी युवा मेळाव्यात जाहीर सभेला संबोधित केलं. आपल्या खास शैलीत भाषण करताना, 'यंदा विधानसभेला आपलं झापूक-झुपूक वारं आहे,' असं म्हणत धीरज देशमुखांच्या कामाचं कौतुक केलं. एवढ्यावरच न थांबता रितेश देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.


भावाचं आणि समर्थकांचं कौतुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या भाषणाला सुरुवात करताना, "लहानपणी मी धीरज म्हणायचो पण आता मला तुमच्यामुळे धीरज भैया म्हणावे लागतयं, असं म्हणताच समर्थकांनी 'धीरज भैया' अशी घोषणाबाजी केली. "ही सभा धीरज यांच्या लिडची सभा आहे. मी गेल्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं हा गडी आपला आहे. तुमच्यासोबत राहील ते तुम्ही केलं आणि 1 लाख लीड दिली," असं म्हणत रितेशने समर्थकांचं कौतुक केलं. 


भावासाठी भाजपाविरोधात प्रचार


"विरोधी पक्ष नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे जावं म्हणून येतात हि तुमच्या निष्ठेची, कामाची पावती आहे," असं म्हणत अभिनेता रितेश देशमुखने आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांचं आणि आपल्या भावाचं कौतुक केलं. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश कराड यांच्याविरोधात उभ्या असलेल्या आपल्या भावाच्या प्रचारासाठी रितेश देशमुखने भाषण केलं. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी रितेश देशमुख यांनी जाहीर सभा घेतली.


असं बटण दाबा की...


"आता विधानसभेला आपलं झापूक-झुपूक वारं आहे. येत्या 20 तारखेला तुम्ही जे बटन दाबणार आहात ते असं दाबा कि त्यांचे पुढच्या वेळचे डिपाजीट आत्ताच जप्त झाले पाहिजे. आता जे विरोधक आहेत भाजपा आमदार रमेश कराड ते पण सध्या आमदार आहेत. त्यामुळे त्यांना या बटनाची गरज नाही," अशा शब्दांत अभिनेता रितेश देशमुख यांनी लातूर ग्रामीणचे भाजपा आमदार तथा उमेदवार रमेश कराड यांच्यावर नाव न घेता टिका केली आहे. "अमित आणि धीरज इथं एक नंबर आणि आम्ही जिथे आहोत तिथे बरं आहोत," असंही रितेश देशमुख यांनी म्हटलं आहे. 


भाजपावर सडकून टीका


"कृष्ण म्हणाले होते कर्म हाच धर्म आहे. जो काम करतो प्रामाणिकपणे त्याला खरंच तो धर्म केल्यासारखा वाटतो. पण जे काम करत नाहीत त्यांना गरज पडते धर्माची! सगळे म्हणतात धर्म धोक्यात आहे. प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्माला वाचवा. धर्म बचाओ. आमचा धर्म आम्हाला प्रिय आहे. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. जे लोक आणि पक्ष तुम्हाला धर्म बचाओ सांगत आहेत ते खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थनाला करत आहेत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा," असा टोला रितेशने लगावला.


काहीच शंका नाही की महाविकास आघाडी जिंकणार


"काही गरज नाही या भूल थापांना बळी पाडायची. धर्म बचाओ सांगणाऱ्यांना सांगा धर्माचं आम्ही बघून घेतो तुम्ही कामाचं सांगा. धर्माचं आम्ही बघून घेतो, आमच्या पिकापाण्याला काय भाव देताय ते सांगा. धर्माचं आम्ही बघून घेतो, आमच्या आई-बहिणी सुरक्षित आहेत की नाही ते सांगा. येत्या 20 तारखेला फार मोठी जबाबदारी अमितभैय्यांवर येणार आहे. त्यांच्यात ती पेलण्याचं समार्थ्य आहे. यावेळेस जे वादळ येणार आहे ते पाहता कोणाच्याही मनात शंका नाही की सरकार महाविकास आघाडीचंच येणार आहे. तुमच्या बटणमध्ये ताकद आहे," असं रितेश देशमुखने भाषणात म्हटलं. 


वडिलांची आठवण


"येत्या काळात गाफील राहू नका. विजयाचा गुलाल उधळायला आपण सगळे तयार राहायला पाहिजे. आज देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही," असं म्हणत वडिलांचं स्मरण करत रितेश देशमुख यांनी आपलं भाषण संपवलं.