Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar Slams R R Patil: सांगलीमधील तासगाव विधानसभा मतदासंघामधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष तासगावकडे लागून राहिलेलं असतानाच आज संजय पाटलांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणावरुन खोचक विधान केलं. आर. आर. आबांनी आपला केसाने गळा कापल्याचं अजित पवार म्हणाले. 


नाव न घेता शरद पवारांवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मला मोदी साहेबांचं काम आवडलं. ते 24 तास काम करतात. भारताचा कसा विकास होईल याच्यासाठी काम करतात. 2014 चा निकाल आठवा. निकाल लागल्यावर राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला, पाहिले का नाही? आम्ही ते टीव्हीवर पाहिले. आबा पण माझ्याबरोबर आमदार झाले सगळ्या कंपनीचा पराभव केला. राष्ट्रवादीची स्थापना का झाली? परकीय व्यक्ती या देशाची पंतप्रधान होता कामा नये म्हणून परकीय व्यक्ती कोण सोनिया गांधी! म्हणून वेगळा पक्ष काढला. ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या आणि निकाल लागला. काँग्रेसच्या विलासराव देशमुख सरकारला आपण पाठिंबा दिला. चार महिने आधी वेगळा पक्ष काढला आणि पुन्हा त्यांच्याच दावणीला जायचं," असं खोचक विधान करत आपल्या भाषणात अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. 


तासगावची अवस्था बघा


"तासगावची काय अवस्था आहे? या बारामतीला बघा. तासगावचे बस स्थानक बघितलं काय अवस्था झाली आहे. माझं बारामतीचे स्टॅण्ड बघा. नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते नुसते भाषणे करून तुमची पोट भरणार नाहीत. इतके वर्ष गृहमंत्री कोण राहिले? आर. आर. पाटील! आर. आर. गेल्यानंतर स्मिताच्या लग्नाला मी तिथे उभा होतो ही आमची संस्कृती आहे. पण आज इथे तासगावमध्ये काय कामं झाली? हे चक्र आहे. आम्ही खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री सगळी पदी भोगली. आता पुढे नवीन पिढी देखील तयार केली पाहिजे. पुढच्या पिढीला देखील संधी दिली पाहिजे. या मतदारसंघातल्या सूतगिरणीची काय अवस्था शेजारच्या पलूस तालुक्यातील सूतगिरणीची अवस्था बघा. याचं कारण काय तर माणूस कर्तृत्ववान असावा लागतो," असं म्हणत अजित पवारांनी तासगावमधील कामांवरुन टीका केली.


नक्की वाचा >> 'RR आबांनी फक्त TV वर दिसण्याचं काम केलं, तरुणांच्या...'; संजय पाटलांची टीका! रोहित यांना म्हणाले, 'अरे बाळा...'


"तासगावची काय अवस्था आहे ते बघा. भावनिक होऊन मत देऊन प्रश्न सुटत नाही. सगळी सोंग करतात पण पैश्याचे सोंग करता येत नाही. दीड 2 हजार कोटींची निधी मी माझ्या आमदारांना दिला आहे. लोकसभेला मागासवर्गीय मते आम्हाला मिळाली नाही कारण संविधान बदलणार म्हणून सांगितले. पण संविधान बदलण्याचा नेरिटीव्ही सेट केला गेला. शेतकऱ्यांना नुसतं वीजबिल माफ केलं नाही तर झिरोचं बिल दिलं आहे. नुसता आमचा आवाज नाही, काम चालतं," असं अजित पवार सभेला उद्देशून म्हणाले.


लाडकी बहीणचा उल्लेख


"आम्ही चुकलो होतो. पण आमच्या लक्षात आल्यावर आम्ही सुधारलो ना, म्हणून दोन कोटी तीस लाख लाडक्या बहिणींना लाभ दिला. बहिणीने आम्हाला राखी बांधली म्हणून आम्ही ओवाळणी दिली आणि ओवाळणी दिल्यावर बहीण भाऊ कधी काढून घेतो का?" असा सवाल करत अजित पवारांनी या योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाही असं सूचित केलं. "आता माझ्या महिला भगिनी सांगितले आणि बटन दाबतील, ते घड्याळाचे, धनुष्यबाणाचे आणि कमळाचे, कारण ही योजना पाच वर्षे चालवायची आहे. योजना बंद करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का?" असा सवाल अजित पवारांनी केला. 


...तर आतापर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता


"एखादा नेता मंत्री झाला झाला की तो संस्था, कारखाने, रोजगार उद्योग काढतो पण इथे काही केली नाही. 2004 मध्ये उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील झाले. गरीब कुटुंबातील आहेत म्हणून आपण त्यावेळी मदत केली. राष्ट्रवादीचे आमदार अधिक असताना आणि मुख्यमंत्रीपद मिळत असताना उपमुख्यमंत्रीपद घेतले, त्यावेळी मुख्यमंत्री घेतले असते तर आजपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, आता जाऊ दे," असं अजित पवार भाषणात म्हणाले. 


नक्की वाचा >> अर्ज भरतानाच सरवणकरांचा मास्टर स्ट्रोक! आता स्वत: CM शिंदे, राजही काही करु शकत नाहीत; कारण...


मीच हेलिकॉप्टरने...


आर. आर. पाटील यांनी मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर दिलेल्या राजीनाम्याचाही उल्लेख अजित पवारांनी या भाषणामध्ये केला. "मुंबई बॉम्बस्फोटनंतर, 'बडे बडे शहर मे छोटी छोटी बाते होती है' या वाक्यामुळे राजीनामा देऊन घरी गेले. त्यानंतर तीन महिन्यातच आबांनी सांगितलं की आता माझ्याकडे कोणीच येत नाही. म्हणून मीच विनायक मेटे यांना हेलिकॅप्टर घेऊन अंजलीला पाठवलं आणि आबांना घेऊन यायला सांगितलं आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं. प्रत्येक वेळी आर आर पाटलांना आधार दिला. तंबाखू खाऊ नको म्हणून मी जाहीर सभेत आबावर टीका केली होती. आपले म्हणुन बोललं होतो,


70 हजार कोटींच्या त्या फाईलबद्दलचं गुपित केलं उघड


आर आर आबांनी आपला केसाने गळा कापला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा फाईल कशी तयार झाली याबद्दल भाष्य केलं. त्यावर आपली चौकशी करण्यासाठी आर. आर. आबांनी सही कशी केली याचा उलगडा अजित पवारांनी केला.  आर आर पाटलांनी आपल्याला कामाला लावले, अशी खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली. "मला 70 हजार कोटींची भ्रष्टाचाराचा आरोप झाला. फाईल तयार केली. अजित पवारांची ओपन चौकशी करण्याची सही आर आर पाटील यांनी केली. वाईट वाटले. आपलं काही तर चुकलं असेल तर पण आपल्याला कामाला लावून गेला. त्या फाईलवर आबांनी केलेली. सहीबद्दल देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मला कोणी सही केली हे दाखवलं होतं," असं अजित पवार म्हणाले.


नक्की वाचा >> शिंदेंबरोबरच्या Adjustment मुळे BJP हक्काचा मतदारसंघ गमावणार? बड्या नेत्याची बंडखोरी; 3 मतदारसंघात फटका


मंत्रिपदाचं आश्वासन


"पुढे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, तुम्ही संजयकाका पाटलांना निवडून द्या इथं मंत्रीपद येईल," असं आश्वासन अजित पवारांनी स्थानिकांना दिलं.